घरमहाराष्ट्रनिवडणूक प्रचारासाठी तयार खास साडी

निवडणूक प्रचारासाठी तयार खास साडी

Subscribe

राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष जोमाने प्रचार कामाला लागले आहेत.अनेक उमेदवारांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवून विशेष तयारी सुरू केली आहे. प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या साड्यांची ऑर्डर दिली आहे. आतापर्यंत 5 हजार पेक्षा जास्त साड्यांची ऑर्डर देण्यात आली आहे. या साडयांची किंमत 180 रुपयांपासून 600 रुपयांपर्यंत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या बजेटनुसार या साड्यांची ऑर्डर दिली आहे.

सध्याच्या डिजिटल युगात निवडणूक प्रचारातही आमुलाग्र बदल झाला आहे. निवडणूक प्रचाराला डिजिटल जोड देत निदान मतदानापर्यंत लोकांच्या लक्षात रहावे म्हणून राजकीय पक्ष प्रचारासाठी वेगवेगळ्या कृप्त्या लढवत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा साडीवर खुबीने वापर करण्यात आला होता. आता या साड्यांचा ट्रेंड सेट होऊ पहात आहे.

- Advertisement -

वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्ह असलेल्या साड्या निवडणूक प्रचार सामुग्री विक्रेत्यांनी आपल्या दुकानात ठेवल्या आहेत. त्याला राजकीय पक्षांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या साडयांची राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. आताच विक्रेत्यांना ५ हजारांपेक्षा जास्त साड्यांच्या आर्डर मिळू लागल्या आहेत. निवडणुकीचा रंग जसा जसा चढत जाईल तशी या साड्यांची विक्री वाढत जाईल, असे विक्रेत्यांचे मत आहे. कपड्याच्या दर्जावरून या साड्यांचा दर ठरविण्यात येत आहे.

सुरतच्या बाजारातून येणार साड्या
आशिया खंडातील सर्वात मोठा कापड बाजर म्हणून गुजरातच्या सुरत शहराची ओळख आहे. यंदा महाराष्ट्रातील विधान सभा निवडणुकीत राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हे असलेले टी-शर्ट, टोपी आणि विशेष साडी हे प्रचार साहित्य सुरतच्या बाजारातून मुंबईत दाखल होणार आहे. तेथूनच या साड्या देखील मुंबईत येणार आहेत. या साड्यांवर प्रिंटिंग करण्याचे काम सुरू झाले आहे.

- Advertisement -

डिझायनर एक्सपर्टची मदत
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष प्रचार करण्यासाठी आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्वत: साड्यांची डिझाईन करत आहेत. त्यासाठी डिझायनर एक्सपर्टची मदत घेण्यात आली आहे. उमेदवारांनी ऑर्डर दिलेल्या साड्यांवर निवडणूक चिन्हांसोबतच उमेदवाराचा चेहरासुध्दा दिसणार आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -