आशा वर्करना प्रशिक्षणासाठी हॉर्वड विद्यापीठाची मदत

आशा वर्करच्या कामाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांना कौशल्यपूर्ण विशेष प्रशिक्षण देण्यात यावे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

Special training should be given to asha workers
आशा वर्करना प्रशिक्षणासाठी हॉर्वड विद्यापीठाची मदत

राज्यातील प्राथमिक आरोग्यसेवा देणाऱ्या आशा वर्करच्या प्रशिक्षणासाठी हॉर्वड विद्यापीठाची मदत घेतली जाणार आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य सेवेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान देण्यासाठी, तसंच,‘आशा’ वर्करना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण हॉर्वड विद्यापीठाच्या माध्यमातून मिळावं यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. सामान्यांना गुणवत्तापूर्ण आणि जलद अशी आरोग्य सेवा देण्यासाठी विशेषत: ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर दिला जात आहे. विभागाचा पदभार स्विकारल्यानंतर आरोग्यमंत्री टोपे यांनी पहिल्या बैठकीत प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत उपकेंद्रांचे आरोग्यवर्धीनी केंद्रात रुपांतर करून सामान्यांना आरोग्य सुविधा देण्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

आरोग्य विभागाच्या रुग्णालयांचे जाळे ग्रामीण भागात जास्त आहे. तेथे तंत्रज्ञानाच्या वापर करत अत्याधुनिक उपचार सुविधा देता याव्यात यासाठी विभाग प्रयत्नशील असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दुर्गम भागात तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल्यास शहरातील नामांकीत डॉक्टरांचा सल्ला त्याद्वारे रुग्णांना देता येईल का, याबाबत हॉर्वड विद्यापीठाच्या माध्यमातून कशी मदत करता येईल याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली.

आशा वर्करचा दर्जा उंचावणार – 

ग्रामीण भागात आरोग्यसेवेसाठी ‘आशा’ कार्यकर्ती मोठा दुवा ठरत आहेत. त्यांच्या माध्यमातून लसीकरण, गर्भवती महिलांची काळजी, बालकांचे आरोग्य या क्षेत्रात प्राथमिक स्तरावरचे काम करण्यात येते. आशा कार्यकर्तींच्या या कामाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांना कौशल्यपूर्ण विशेष प्रशिक्षण देण्यात यावे. त्यासाठी हॉर्वड विद्यापीठ, वुई स्कुल यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.