(SS UBT Vs Chandrachud) मुंबई : उत्तर प्रदेशात संभल येथे जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरून दंगा भडकवला गेला. तेथील पोलीस गोळीबारात आतापर्यंत पाच जण मरण पावले. जामा मशिदीच्या खाली मंदिर आहे, असा काही लोकांचा दावा होता आणि त्यासाठी मशिदीचे सर्वेक्षण करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. सरन्यायाधीश चंद्रचूड हे अशी आग लावून गेले आणि त्याची फळे देश भोगत आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे. (Chandrachud once again on the target of Thackeray group)
आमदारांच्या अपात्रता प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. आज, गुरुवारी पुन्हा ठाकरे गटाने ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून चंद्रचूड यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा – Politics : मोदी सरकारचा संविधान दिवस धक्कादायक नाही; ठाकरे गटाची बोचरी टीका
मशिदीचे सर्वेक्षण करायला हरकत नाही असा एक निर्णय चंद्रचूड काळात दिल्यापासून भक्त चेकाळले आहेत आणि हाती कुदळ-फावडी घेऊन सगळ्याच मशिदींच्या तळघरात खोदकामाला निघाले आहेत. देशाला विघटनाकडे तसेच अराजकाकडे नेणारे हे उद्योग आहेत. संविधानाला हे असले उद्योग मान्य नाहीत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी ते करून घेत आहेत आणि पुन्हा साळसूदपणे संविधान दिवसाचा उत्सव मनवीत आहेत, अशी घणाघाती टीकाही ठाकरे गटाने केली आहे.
न्यायालये निष्पक्ष राहिलेली नाहीत आणि घटनात्मक पेचप्रसंगांवर न्याय देण्याऐवजी न्यायाधीश पलायन करतात. निवडणूक आयोग, राजभवन हे मोदी यांच्या अंधभक्तांचे अड्डे बनले आहेत. देशातील निवडणुका हा एक फार्स बनला आहे. मते आणि मतदार विकत घेतले जातात किंवा निवडणूक यंत्रणा ताब्यात घेऊन विजय मिळवले जातात. हा आपल्या लोकशाहीचा खेळखंडोबा आहे आणि तो करणारे संसदेत संविधान दिवस साजरा करतात, अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.
मणिपूर जळत आहे. तेथे भररस्त्यावर महिलांना नग्न केले जात आहे. बलात्कार सुरू आहेत. ते पाहून संविधानाच्या प्रती अश्रूंनी भिजल्या असतील, पण संविधानाचे रक्षण करावे आणि देश संविधानाचा सन्मान करून चालवावा असे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वाटत नाही, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. (SS UBT Vs Chandrachud : Chandrachud once again on the target of Thackeray group)
हेही वाचा – Maharashtra Cabinet : मंत्रिपदांबाबत अजित पवार यांची स्पष्ट भूमिका, भाजपाकडे केली ही मागणी