(SS UBT) मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांना देशातील मुख्य समस्येवरचे लक्ष हटवायचे आहे. देशातील बेरोजगारी हा जॉर्ज सोरोसपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे, पण भाजपाचे प्रवक्ते आता नवीन माहिती घेऊन आले. जवाहरलाल नेहरू यांचे चुलतभाऊ बी. के. नेहरू यांची हंगेरी वंशाची पत्नी फोरू नेहरू यांचे म्हणे जॉर्ज सोरोसशी निकटचे संबंध होते. म्हणजे राहुल गांधी यांच्या चुलत चुलत चुलत आजीच्या संपर्कात जॉर्ज सोरोस होते. हे म्हणजे सध्या मशिदी आणि इतर प्रार्थनास्थळांखाली जे खोदकाम चालले आहे, त्यातलाच प्रकार, असल्याची खोचक टीका ठाकरे गटाने केली आहे. (Thackeray group criticizes BJP over unemployment issues)
जॉर्ज सोरोसचा गजर करत भारतीय जनता पक्ष संसद चालू देत नाही असे चित्र निर्माण झाले आहे आणि या गोंधळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत हजेरी लावण्याचे सोडाच, पण संसद परिसरातूनही पलायन केले आहे. शेतकरी आजही शंभू बॉर्डरवर त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. जॉर्ज सोरोस हा बहाणा आहे, असल्याची टीका ठाकरे गटाने केली आहे.
हेही वाचा – SS UBT Vs BJP : …मग तुमचे विश्वगुरू काय कामाचे! ठाकरे गटाच्या निशाण्यावर भाजपा
आज देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या बाजारभावास योग्य किंमत हवी आहे, सुशिक्षितांना नोकऱ्या हव्यात, महिलांना सुरक्षा हवी. मोदी 85 कोटी लोकांना फुकट धान्य देत असल्याचा डंका पिटतात. ही भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण आहे. अशी भीक ते आणखी किती काळ देणार? मोदींनी देशाला गुलाम आणि जनतेला अफूबाज अंधभक्त केले असल्याचा घणाघातही ठाकरे गटाने केला आहे.
जॉर्ज सोरोसचे भारतीय जनता पक्षातील प्रमुख लोकांशी निकटचे संबंध आहेत आणि जॉर्ज काही गुन्हेगार नाही. त्याने वैध मार्गाने पैसे कमावले आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तो अनेक देशांत लोकशाहीवादी संस्था, शैक्षणिक, सामाजिक संस्थांना दान करीत असतो. भविष्यात यात मोदींचे नाव आले तरी आश्चर्य वाटायला नको, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखातून लगावला आहे. (SS UBT: Thackeray group criticizes BJP over unemployment issues)
हेही वाचा – SS UBT Vs Fadnavis : गौतम अदानी सागर बंगल्यावर पोहोचले आणि…, ठाकरे गटाकडून फडणवीस लक्ष्य