(SS UBT) मुंबई : साताऱ्यातील जयकुमार गोरे या मंत्र्याने सत्ता आणि पोलिसी बळाचा गैरवापर करून स्थानिक पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करून अटक करायला भाग पाडले. टिळक, आगरकर, जांभेकर, आचार्य अत्रे यांच्या पत्रकारितेचा वारसा सांगणारा हा आपला महाराष्ट्र आहे. विरोधी पक्षांत लोकशाहीची बूज आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ऊर्जा उरली असेल तर ही अटक गांभीर्याने घेऊन मंत्री जयकुमार गोरे यांच्या गुंडगिरीवर विधानसभेत सरकारला सळो की पळो करून सोडले पाहिजे, असे आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. (Uddhav Thackeray challenges opposition leaders over journalist arrest)
तरुण पत्रकाराच्या अटकेने काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातील पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आणि पत्रकारितेवर सेन्सॉरशिप लागू झाली आहे काय? सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडगिरीचे आरोप कोणी समोर येऊन पुराव्यासह करीत असतील तर, त्याकडे पत्रकारांनी डोळेझाक करण्याचे फर्मान सुटले आहे काय? महाराष्ट्रात मंत्र्यांना कसेही वागण्याचा, सत्य सांगणाऱ्यांना धमक्या देण्याचा परवाना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे काय? या प्रश्नांची उत्तरे विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवीत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा – Thackeray Vs Mahayuti Govt : हे राज्य शिवरायांचे नसून मोदींचे झाले…, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
साताऱ्यात शिवरायांचे दोन वंशज फडणवीस सरकारचे समर्थक आहेत. या सर्व प्रकरणात सातारचे दोन्ही श्रीमंत छत्रपती गप्प बसणार आहेत काय? कोणीही गप्प बसले तरी महाराष्ट्रातल्या सर्व पत्रकारांनी, लोकशाही मूल्यांसाठी लढणाऱ्या जनतेने जयकुमार गोरे यांच्या दडपशाहीविरुद्ध ठामपणे उभे राहायलाच हवे. सत्य सांगणे, लिहिणे हा महाराष्ट्रात गुन्हा ठरला तर हे राज्य मूक-बधिर गुजरात होईल, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखातून केली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तरीही राज्यातील अनेक गावगुंड त्यांच्या मंत्रिमंडळात असून कायदा आणि पोलीस या ‘आकां’च्या कोठीवर नाचत आहे काय? असा प्रश्न जनतेला पडला आहे. पोलिसांचा हा असा मुक्त गैरवापर महाराष्ट्रात जागोजाग सुरू आहे आणि ते लोण आता स्वातंत्र्यलढ्यात पुढे असलेल्या छत्रपतींच्या साताऱ्यात पोहोचले. गोरे यांचे वागणे हे बीडच्या वाल्मीक कराडप्रमाणे आहे आणि हे कराड थेट सत्तेत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
हेही वाचा – Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्ग करायचाय, लादायचा नाही; फडणवीसांचे विरोधकांना उत्तर