(SS UBT Vs BJP) मुंबई : भाजपात नाराज असलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा मुहूर्त ठरवला; पण लोकसभेत विरोधी पक्षाचे उपनेते असलेल्या व्यक्तीचे हे पक्षांतर मनमोहन सिंग यांना मान्य नव्हते आणि गोपीनाथ मुंडे यांचे पक्षांतर त्यांनी रोखले. बहुधा याच त्यांच्या दुर्लभ गुणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी दोन मीटर जमीन नाकारली असावी, असा जोरदार हल्ला ठाकरे गटाने केला आहे.
पंतप्रधान मोदी यांचे सरकार हे तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांच्या कुबड्यांवर टिकून आहे. मोदी सरकारचे जे मृत्यूनंतरच्या द्वेषाचे राजकारण, तेही माजी डॉ. मनमोहन सिंग यांच्या बाबतीत सुरू आहे, ते या दोघांना मान्य आहे का, याचा खुलासा चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्याकडून होणे गरजेचे आहे, असे आवाहन ठाकरे गटाने केले आहे.
हेही वाचा – SS UBT Vs NDA Govt : हिंदुस्थान हा मोदी-शहा सरकारच्या बापजाद्यांची कमाई नाही, ठाकरे गटाचा संताप
मनमोहन सिंग हे देशाचे सगळ्यात यशस्वी अर्थमंत्री आणि प्रधानमंत्री होते. तरीही ते राजकीय नेते बनू शकले नाहीत. हे खरे असले तरी पक्ष फोडणे, सरकारे फोडणे, विरोधी पक्षाचे प्रमुख नेते आपल्याकडे खेचण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करण्यासारखे लोकशाहीविरोधी उद्योग मनमोहन सिंग यांनी केले नाहीत, असे सांगत ठाकरे गटाने भाजपावर शरसंधानही केले आहे.
जागतिक-आर्थिक संकटाशी सामना करून भारताची अर्थव्यवस्था मजबूत बनवणाऱ्या मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कार्याचा कधीच डांगोरा पिटला नाही. राजकीय विरोधकांशी सूडाने वागण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात म्हणजेच ‘जेएनयू’त मनमोहन सरकारविरुद्ध आंदोलन सुरू झाले. त्यावेळी पंतप्रधान कार्यालयाने ‘जेएनयू’ प्रशासनात प्रथमच हस्तक्षेप करून सूचना दिल्या की, विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नका आणि आंदोलक विद्यार्थ्यांना विद्यापीठातून बडतर्फ करू नका. राज्यकर्त्यांची संवेदनशीलता ही अशीच असावी लागते, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांना मोदी सरकारने अंत्यसंस्कारासाठी राष्ट्रीय स्मारक स्थळावर जागा नाकारली. हा या सरकारचा कद्रूपणा आहे. प्रामाणिकपणाची ही अॅलर्जीच म्हणायला हवी. मात्र निगमबोध घाटावर डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव पोहोचताच देशवासीयांना हुंदके फुटले. स्वतः काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना अश्रू अनावर झाले. जनतेच्या हृदयातील डॉ. मनमोहन सिंग यांचे स्थान मोदी आणि त्यांच्या लोकांना पुसून टाकता येणार नाही, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
मोदी सरकारने राजघाटावर मनमोहन सिंगांना दोन मीटर जागा नाकारली. मृत्यूनंतर कोणतेही वैर राहत नाही, असे हिंदू धर्म आणि हिंदुत्व सांगते. मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हिंदुत्व सूडाच्या शाईने लिहिलेले आहे, असे दिसते. इतिहासात या कृतघ्नपणाची नोंद राहील, असे सामना दैनिकातील अग्रलेखातून ठाकरे गटाने नमूद केले आहे.
हेही वाचा – Dr. Manmohan Singh : काँग्रेसने अदानींकडे विनंती अर्ज करायला पाहिजे का? ठाकरे गटाचा खोचक प्रश्न