(SS UBT Vs BJP) मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र तसेच झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत पक्षीय प्रचारात दंग आहेत आणि तिकडे मणिपुरात पुन्हा एकदा हिंसेचा आगडोंब उसळला आहे. तेथील जिरीबाम हा जिल्हा सध्या हिंसाचाराचा केंद्रबिंदू बनला आहे. मागील आठवड्यापासून त्या ठिकाणी हिंसेचा वणवा भडकला आहे, असे टीकास्त्र ठाकरे गटाने सोडले आहे. (Thackeray group criticizes Modi-Shah regarding violence in Manipur)
जिरीबाममधून अपहरण केलेल्या एकाच कुटुंबातील तीन महिला आणि तीन मुलांचे मृतदेह शनिवारी सापडल्यामुळे तेथील वातावरण आणखी तापले आहे. लोकांचा संताप एवढा अनावर झाला की, त्यांनी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्यासह आरोग्यमंत्री रूपम रंजन यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. शिवाय तीन आमदारांची घरे पेटवून दिली, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.
हेही वाचा – SS UBT Vs BJP : संपूर्ण देशच ‘एक’ आहे आणि ‘सेफ’देखील, ठाकरे गटाने मोदींनी सुनावले
मणिपूर हे मागील दीड वर्षापासूनच वांशिक हिंसेच्या वणव्यात होरपळते आहे. तेथे जाऊन हा वणवा विझवावा असे ना पंतप्रधानांना वाटते, ना केंद्रीय गृहमंत्र्यांना. त्यामुळे काही काळ वरकरणी शांतता दिसते, परंतु एखाद्या घटनेच्या निमित्ताने कुकी आणि मैतेई या दोन समाजांत खदखदत असलेला ‘लाव्हा’ उफाळून येतो आणि मणिपूर परत परत हिंसेच्या वणव्यात होरपळत राहते, असे सांगत ठाकरे गटाने मोदी-शहा यांच्यावर शरसंधान केले आहे.
गेल्या आठवड्यात गुरुवारी हल्लेखोरांनी एका आदिवासी महिलेवर पाशवी अत्याचार केला आणि नंतर तिला जिवंत जाळले. तेवढ्यावरच हल्लेखोरांचे समाधान झाले नाही. त्यांनी नंतर 17 घरे पेटवून दिली. जिरीबाम जिल्ह्यात हा भयंकर प्रकार घडला. या घटनेनंतर सोमवारी सुरक्षा दलांनी जिरीबाम परिसरातच मोठी कारवाई केली. तेथे झालेल्या चकमकीत त्यांनी 11 संशयित दहशतवाद्यांना ठार केले. या चकमकीत सीआरपीएफचा एक जवानही जखमी झाला, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
सुरक्षा दलांना आलेले हे यश मोठे असले तरी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला केला होता, हे कसे विसरता येईल? आता तर ही चकमक बनावट असल्याचा आरोपच कुकी संघटनांनी केला आहे. त्यामुळे या चकमकीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे सांगत ठाकरे गटाने संशय व्यक्त केला आहे. (SS UBT Vs BJP: Thackeray group criticizes Modi-Shah regarding violence in Manipur)
हेही वाचा – Kalicharan : हिंदू मतदानाला जात नाही, म्हणून मुस्लिम राजा होतो; कालीचरण महाराज जरांगेंना म्हणाले राक्षस