(SS UBT Vs Mahayuti) मुंबई : मतदानाच्या एक दिवस आधी मुंबई, विरार-नालासोपारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणी कोट्यवधींचे खोके सापडले आणि हे वाटप भाजपा तसेच मिंधे यांचेच लोक करीत होते. मतदानाला काही तास उरले असताना पैशांची ही धरपकड झाली. याचा अर्थ याआधी पैसा मोठ्या प्रमाणात मतदारसंघांमध्ये पोहोचला आणि पोलीस बंदोबस्तात पैशांचे वाटप करून मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीस बट्टा लावण्याचा हा प्रकार बिनबोभाट घडत असताना आपला तो निवडणूक आयोग झोपाच काढत असावा, अशी जोरदार टीका ठाकरे गटाने केली आहे. (Thackeray faction targets Election Commission over money distribution)
नालासोपारा, विरार भागात भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे पैशांच्या बॅगा घेऊन एका हॉटेलात शिरले आणि वाटप सुरू करताच तेथे निवडणूक आयोगाचे लोक पोहोचले नाहीत, तर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे लोक पोहोचले. चार तास तावडे यांना घेराव घालून ‘जाम’ केले. तावडे यांच्या खोलीत पैसे होते, पण निवडणूक आयोगाने वेळेत पंचनामा करून गुन्हा दाखल केला नाही. गुन्हा दाखल केला तो आचारसंहितेचा भंग केल्याबाबत. म्हणजे निवडणूक आयोगाचे नियम मोडून पत्रकार परिषद घेतली वगैरे किरकोळ विषयांवर, अशा शब्दांत ठाकरे गटाने निशाणा साधला आहे.
हेही वाचा – Maharashtra Election 2024 : लोकशाहीवर दबाव आणण्याचा हा प्रकार, ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल
तावडे यांच्याकडे पाच कोटी होते, पण आयोगाने फक्त नऊ लाख कागदावर आणले असा आरोप आमदार ठाकूर करत आहेत. मग वरचा मलिदा सुखरूप बाहेर काढण्यासाठी पोलीस, आयोगाच्या लोकांनी कोणत्या दरवाजाचा वापर केला? असा प्रश्न सामना दैनिकातील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे.
सांगोल्याच्या टोल नाक्यावर मिंधे गटाच्या आमदारांचे पंधरा कोटी पकडले गेले होते, पण थातूरमातूर रक्कम जप्त करून उरलेली रक्कम ज्याची त्याला परत करून निवडणूक आयोग आणि पोलिसांनीही आपले मिंधेगिरीचे कर्तव्य पार पाडले. सांगोल्यात गाडी तसेच ड्रायव्हर हा सरळ आमदाराचा होता. तरीही त्यांना वाचविण्याचा थुकरटपणा हा केलाच, अशी खोचक टीकाही ठाकरे गटाने केली आहे.
तावडे यांचा गेम कोणी केला?
नालासोपाऱ्यात ‘तावडे’ यांचा गेम मिंध्याने केला की भाजपामधील अन्य कोणी केला, हे रहस्यच आहे. कारण नंतर एक फोन आला आणि ठाकूर मंडळ त्याच तावडे यांच्यासह कुठेतरी बसायला आणि बोलायला एकाच गाडीतून गेले. जनतेला मूर्ख बनविण्याचे हे खेळ लोकशाहीत सुरू आहेत, अशी टिप्पणी ठाकरे गटाने केली आहे. (SS UBT Vs Mahayuti: Thackeray faction targets Election Commission over money distribution)
हेही वाचा – Maharashtra Election 2024 : एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल करा; काँग्रेसने केली आयोगाकडे मागणी