Homeमहाराष्ट्रSS UBT : संविधानाच्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टींना आता प्रतिष्ठा, काय म्हणाला...

SS UBT : संविधानाच्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टींना आता प्रतिष्ठा, काय म्हणाला ठाकरे गट?

Subscribe

महाराष्ट्रात प्रौढ पुरुष आणि महिलांची एकत्रित संख्या 9 कोटी 54 लाख असताना निवडणूक आयोगाकडे विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात 9 कोटी 70 लाख मतदार कसे? याच आकडेवारीनुसार राज्यात अचानक 16 लाख मतदार वाढलेले दिसतात. त्याचा हिसाब किताब कोठेच नाही.

SS UBT On Bogus Voting : मुंबई : जेथे केंद्रीय निवडणूक आयोगच संविधानाची मूल्ये पाळत नाही आणि निवडणूक आयोगाबाबतच्या तक्रारी गांभीर्याने घ्यायला राष्ट्रपती तयार नाहीत, तेथे इतरांना काय दोष द्यायचा, असा सवाल ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून विचारला आहे. महाराष्ट्र आणि हरयाणाच्या निवडणुकीत लांड्या-लबाड्या झाल्याच आहेत. त्यामुळेच भाजप आणि त्यांच्या सोबतचे लबाड कोल्हे-लांडगे जिंकू शकले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुरावे, आकडे, डेटा यांचे सादरीकरण केले, तरीही परिस्थितीत बदल होताना दिसत नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. (ss uddhav thackeray shivsena slams bjp, election commission on bogus voting)

काँग्रेसच्या डेटा ऍनालिटिक्स विभागाचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांनी निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल जे प्रश्न निर्माण केले ते महाराष्ट्रातील सर्वसामान्य मतदारालाही पडले आहेत. महाराष्ट्रात प्रौढ पुरुष आणि महिलांची एकत्रित संख्या 9 कोटी 54 लाख असताना निवडणूक आयोगाकडे विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात 9 कोटी 70 लाख मतदार कसे? याच आकडेवारीनुसार राज्यात अचानक 16 लाख मतदार वाढलेले दिसतात. त्याचा हिसाब किताब कोठेच नाही, असेही अग्रलेखात म्हटले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मुद्दा मांडला, तो म्हणजे जे मतदार वाढले त्यांचे मतदान फक्त भाजपप्रणीत महायुतीलाच कसे पडले? 48 लाख नवमतदार नोंदले, त्यांचे मतदान काय सर्वच्या सर्व एकाच पक्षाला पडले? हे मतदार खरेच होते काय? ही मते आभाळातून पडली काय? हे बनावट मतदार होते काय? की परराज्यांतील लोकांना मतदार यादीत घुसवून मतदान करून घेतले गेले? वाढीव मतदान फक्त भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनाच कसे झाले. इतके काटेकोरपणे मतदान कसे काय होऊ शकते? याचे उत्तर कोणीच देत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

निवडणूक आयोगाकडे निवेदने, शिष्टमंडळे गेली, पण ‘हे असे होऊ शकते’ किंवा ‘संशयास्पद काही नाही’ अशी थातूरमातूर उत्तरे दिली गेली. राष्ट्रपतींकडे सर्वपक्षीय लोक गेले तर राष्ट्रपती त्यावर बोलायला आणि कृती करायला तयार नाहीत. बनावटगिरी करून निवडणुका जिंकणे हे संविधानाच्या कोणत्या मूल्यात बसते? त्यातून प्रजासत्ताकाचे कोणते मूल्य प्रतिबिंबित होते? हा प्रश्न राष्ट्रपतींना पडायला हवा.

संविधान, लोकशाहीच्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टींना आता प्रतिष्ठा मिळत आहे आणि त्यात देशाची प्रत्येक निवडणूक फसली आहे. विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष मतदार नोंदणीपेक्षा मतदान जास्त कसे झाले? एखाद्या बूथवर 411 मतदारांनी मते टाकली व ईव्हीएम उघडताच 522 मते कशी? महाराष्ट्रातील प्रत्येक बूथवर अशा पद्धतीने 100-125 अतिरिक्त मते मिळाली व त्यानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 25-30 हजारांचे बेनामी, अनौरस, लावारीस मतदान मोजले गेले. हे कसे घडले? यांच्या विजयाचा बाप लावारीस असेल तर ही निवडणूक आणि त्यांचा विजय गैरसंविधानिक ठरतो, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.