ऑल द बेस्ट! राज्यात आजपासून दहावीची परीक्षा, या सूचना पाळा आणि मनस्ताप टाळा!

SSC Exam 2023-24 | ज्यात यंदा कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

SSC Exam 2023-24 | राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणार्‍या दहावी बोर्डाच्या परीक्षेला आज गुरुवारपासून सुरुवात होत आहे. राज्यातील एकूण १५ लाख ७७,२५६ विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. ही परीक्षा ५३३ परीक्षा केंद्रांवर होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दहावीच्या परीक्षेला यंदा ६१ हजार ७०८ इतके कमी विद्यार्थी बसले आहेत. ही परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारित असेल. राज्यात यंदा कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बारावीप्रमाणेच दहावीला वाढीव १० मिनिटे मिळतील. पालक आणि विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांतील वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये. मंडळाने प्रसिद्ध केलेले अधिकृत वेळापत्रकच ग्राह्य धरावे. दहावीच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर नेताना जीपीएस ट्रॅकिंग केले जाईल. प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरित करतानाही चित्रीकरण करण्यात येईल. गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियानांतर्गत परीक्षा केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवला जाईल. भरारी आणि बैठी पथके परीक्षा केंद्रांवर असतील.

राज्यात कॉपीमुक्त अभियान

 • प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचे वाटप झाल्यानंतर परीक्षा केंद्रावर कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही
 • परीक्षा केंद्रावरील शंभर मीटर अंतरावर झेरॉक्सची सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश.
 • प्रत्येक तालुक्यातील परीक्षा केंद्रावर भरारी पथक तपासणी करणार.
 • परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. गर्दी टाळण्यासाठी 144 कलम लागण्याची शक्यता.

…अन्यथा कारवाई

 • परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका मिळविणे, विकणे आणि विकत घेतल्यास किंवा मोबाईलसह अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केल्यास परीक्षार्थी विद्यार्थ्याची परीक्षा रद्द होणार.
 • तसेच विद्यार्थ्यास पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध (Rusticate) करण्यात येणार आहे. शिवाय परीक्षार्थ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
 • मंडळाच्या अधिकृत उत्तरपत्रिका, पुरवण्या, आलेख, नकाशे, लॉग टेबल, अनधिकृतपणे मिळवणे आणि वापर केल्यास पुढील एका परीक्षेस प्रतिबंध करण्यात येणार आहे.
 • परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, मिळविणे, विकणे व विकत घेणे तसेच भ्रमणध्वनी आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केली तर पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल होणार

 • मंडळाने मान्यता न दिलेली अथवा प्रतिबंध केलेली साधने, साहित्य परीक्षा दालनात स्वत:जवळ बाळगणे वापरणे.
 • उत्तरपत्रिकेत-पुरवणीत प्रक्षोभक,अर्वाच्च्य भाषेचा वापर, शिवीगाळ लिहिणे किंवा धमक्या देणे, बैठक क्रमांक,फोन नंबर, भ्रमणध्वनी क्रमांक देऊन संपर्क साधण्यास विनंती करणे.
 • विषयाशी संबधित नसलेला अन्य मजकूर लिहिणे, परीक्षा सुरू असताना इतर परीक्षार्थ्यांबरोबर उत्तराच्या संदर्भात गैरहेतूने संपर्क साधणे,एकमेकांचे पाहून लिहिणे, अन्य परीक्षार्थ्यांस तोंडी उत्तरे सांगणे.

प्रश्नपत्रिकेतील चुकांबाबत दिलगिरी
बारावीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकांबाबत मंडळ दिलगीर आहे. विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी यापुढे दक्षता घेतली जाईल, असे शरद गोसावी यांनी यावेळी स्पष्ट केले.