Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र मूल्यांकनात दहावीचा निकाल 99.95 टक्के, विद्यार्थ्यांना गुणांची खैरात

मूल्यांकनात दहावीचा निकाल 99.95 टक्के, विद्यार्थ्यांना गुणांची खैरात

कोकण विभागासह मुलींची बाजी

Related Story

- Advertisement -

नववीचा अंतिम निकाल व दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाच्या आधारे शुक्रवारी राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला. मूल्यमापनावर आधारित लावलेला दहावीचा निकाल तब्बल 99.95 टक्के इतका लागला. यामध्ये कोकणचा सर्वाधिक 100 टक्के निकाल तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 99.84 टक्के इतका लागला. गतवर्षीच्या तुलनेत निकालात 4.65 टक्क्यांनी वाढ झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींची बाजी दिसून आली. मुलींचा निकाल तब्बल 99.96 टक्के तर मुलांचा निकाल 99.94 टक्के इतका लागला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी मूल्यमापन पद्धत निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक इत्यादीच्या आधारे मूल्यमापन करून विषयनिहाय गुण देण्यात आले. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून यंदाही मुलींनी बाजी मारली. राज्यातून यंदा तब्बल १५ लाख ७५ हजार ८०६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये मुलांची संख्या 8 लाख 50 हजार 661 तर मुलींची संख्या 7 लाख 25 हजार 145 इतकी होती.

- Advertisement -

नोंदणी केलेल्यांपैकी १५ लाख ७५ हजार ७५२ विद्यार्थ्यांची संपादणूक करण्यात आली. त्यातील १५ लाख ७५ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 8 लाख 50 हजार 142 म्हणजेच 99.94 टक्के मुले तर 7 लाख 24 हजार 852 म्हणजेच 99.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 0.02 टक्के इतके अधिक होते. राज्यातून उत्तीर्ण नियमित विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ४८ हजार ६८३ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणी, ६ लाख ९८ हजार ८८५ विद्यार्थी प्रथम श्रेणी, २ लाख १८ हजार ७० विद्यार्थी द्वितीय श्रेणी, ९३५६ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ८२८०२ पुनपरिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यातील ८२६७४ विद्यार्थ्यांची संपादणूक करण्यात आली. त्यातील ७४६१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यामध्ये कोकण मंडळाने बाजी मारली आहे. कोकण मंडळाचा निकाल 100 टक्के लागला असून, त्याखालोखाल अमरावती 99.98 टक्के लागला. अमरावती विभागाने गतवर्षीच्या पाचव्या स्थानावरून थेट दुसर्‍या स्थानावर झेप घेतली आहे. तर पुणे, औरंगाबाद, मुंबई, नाशिक, लातूर या मंडळाचा निकाल 99.96 टक्के लागला. गतवर्षी दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या कोल्हापूर विभागाची आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल 99.92 टक्के तर नागपूर विभागाचा 99.84 टक्के इतका निकाल लागला.

- Advertisement -

राज्यात 758 विद्यार्थी अनत्तीर्ण

राज्याचा दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला असला तरी राज्यभरातून तब्बल 758 विद्यार्थी अनुतीर्ण झाले आहेत. यामध्ये नागपूरमधून सर्वाधिक 242, त्याखालोखाल मुंबईतून 130 तर अमरावतीमधून सर्वात कमी 21 विद्यार्थी अनुतीर्ण झाले. कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागल्याने या विभागातून एकही विद्यार्थी अनुतीर्ण झाला नाही. मूल्यमापन पद्धतीमध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत असताना 758 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले ही धक्कादायक बाब आहे. ज्या विद्यार्थ्यांना नववीमध्ये कमी गुण मिळालेले होते तसेच दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाच्या काही परीक्षांना अनुपस्थित राहिलेले विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे दहावीच्या मूल्यमापनाच्यावेळी अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांशी शाळांकडून वारंवार संपर्क साधण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्यात आले आहे.

विभागनिहाय टक्केवारी
पुणे – ९९.९६
नागपूर – ९९.८४
औरंगाबाद – ९९.९६
मुंबई – ९९.९६
कोल्हापूर – ९९.९२
अमरावती – ९९.९८
नाशिक – ९९.९६
लातूर – ९९.९६
कोकण – १००
एकूण ९९.९५

- Advertisement -