ST bus accident in Beed: बीडमध्ये एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

बीडमध्ये एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज(रविवार) सकाळी लातूर-अंबाजोगाई रोडवर घडली. बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्यामुळे चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचसोबतच या अपघातात १५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात भीषण असल्यामुळे क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून जखमींना बाहेर काढावे लागले. तसेच जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये ट्रक आणि बसच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. तसेच या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता त्यांनी देखील घटनास्थळी त्वरीत धाव घेतली. त्यानंतर जखमींना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरती हा भीषण अपघात झाला असून हा अपघात नेमका कशामुळे झाला. या संदर्भातील माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये.

दरम्यान, सकाळच्या सुमारास दाट धुके होते आणि गाडीचा वेगही अधिक होता. त्यामुळे हा अपघात झाला असावा, अशा प्रकारचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. एसटी बस आणि ट्रकचा अपघात झाल्यामुळे दोन्ही भागांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. तसेच अपघातामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. मात्र, या अपघाताची पुढील चौकशी पोलीस करत आहेत.


हेही वाचा : Sri Lanka : क्रिकेटपटूंसाठी निवृत्तीचा मार्ग कठीण होणार, बोर्डाला तीन महिने आधीच द्यावी लागणार नोटीस