मुंबई : येत्या काही दिवसांमध्ये राज्यात नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यामुळे या शपथविधी सोहळ्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. पण असे असतानाच दुसरीकडे एक महत्त्वाची बातमी समोर आली असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या प्रवासाचे साधन असलेल्या एसटी बसची भाडेवाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव देखील एसटी महामंडळाकडून शासनाकडे सादर करण्यात आला आहे. साधारणतः 18 टक्क्यांनी ही भाडेवाढ करण्यात यावी, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता नव्या सरकारच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाल झळ बसणार आहे. (ST Bus travel will be expensive during the new government)
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे तब्बल 18 टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. सातत्याने होत असलेल्या महागाईमुळे एसटी महामंडळाने 18 टक्के भाडेवाढीचा हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणुकीपुर्वीच हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र शिंदे सरकारच्या काळात हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला होता. त्यामुळे आता जर का नव्या सरकारने हा प्रस्ताव स्वीकारला तर प्रवाशांना एसटीतून प्रवास करताना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. पण एसटी महामंडळाला होणाऱ्या तोट्यामुळे ही भाडेवाढ करणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळ तोट्यात आहे. महामंडळाला प्रति दिवस 15 कोटींच्या आसपास तोटा होतो. त्यामुळे ही तूट भरून काढायची असल्यास तसेच एसटी महामंडळाच्या स्थितीत सुधारणा करायची असल्यास ही भाडेवाढ गरजेची असल्याचे म्हटले जात आहे. तसेच, कर्मचाऱ्यांचे वाढलेले वेतन सुरळीत देण्यासाठी, इंधनाचा वाढता दर सोसता येण्यासाठी, सुट्ट्या भागांची वाढती किंमत आणि टायर, लुब्रिकंट यांचे वाढते दर भागवण्यासाठी ही भाडेवाढ महत्त्वाची असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून पाठवण्यात आलेल्या या प्रस्तावाबाबत राज्य सरकार यावर नेमका काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु जर का ही भाडेवाढ करण्यात आली तर आज असलेल्या 100 रुपयांच्या तिकिटामागे 18 ते 20 रुपये जादा मोजावे लागतील.