गोड बातमी : प्रशासनाकडून एसटी महामंडळाला मिळाले २५० कोटी!

एसटी कर्मचाऱ्यांचा एप्रिल महिन्याच्या वेतनासाठी एसटी महामंडळाने महाराष्ट्र शासनाला सवलतीच्या पैशांची मागणी केली होती.

कोरोनामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महामंडळाकडे पैसे नव्हते. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा एप्रिल महिन्याच्या वेतनासाठी एसटी महामंडळाने महाराष्ट्र शासनाला सवलतीच्या पैशांची मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन अदा करण्यासाठी सवलत मुल्यांच्या प्रतिपूर्तीपोटी २५० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच माहे एप्रिल महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

देशभरात कोरोना विषाणूमुळे २४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहिरात करण्यात आला. महामंडळाची मुंबई, ठाणे, व पालघर विभागातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर विभागातील सेवा बंद असल्यामुळे प्रतिदिवस एसटी महामंडळाला २२ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. शासनाकडून सवलत प्रतिपूर्तीद्वारे १३ एप्रिल रोजी मिळालेल्या १५० कोटी या रक्कमेतून एसटी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन शासन निर्णयाप्रमाणे देण्यात आले होते. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांचा एप्रिल महिन्याच्या वेतनासाठी महामंडळाकडे पैसे नव्हते. तसेच एसटी महामंडळाने राज्य सरकारकडून प्रलंबित असलेल्या सवलत मूल्याची रक्कम घ्यावी, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांचा विविध संघटनांनी मागणी केली. तसेच मुख्यमंत्री, वित्त मंत्री आणि परिवहन मंत्री यांना एसटी संघटनाकडून पत्रव्यवहार केला होता. या सर्व प्रयत्नांमुळे शासन निर्णयानुसार रा.प.महामंडळाला वेतन अदा करण्यासाठी सवलत मुल्यांच्या प्रतिपूर्तीपोटी २५० कोटी रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच माहे एप्रिल महिन्याचे देय मासिक वेतन कर्मचाऱ्यांना देण्यासंबंधात रा.प.महामंडळाकडून योग्य त्या सुचना निर्गमित करण्यात येतील.

लॉकडाऊन काळात एसटी महामंडळाला सवलतीचे प्रतिपूर्तीपोटी म्हणून २५० कोटी रक्कम देऊन एसटी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. यातून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटेल.
– श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस