संपात सहभाग घेतलेल्या एसटी चालकाची बसमध्ये आत्महत्या

एसटी कर्मचार्‍यांनी गुरुवारी (दि.२८) विविध मागण्यांसाठी बंद पुकारला होता. राज्य सरकारने कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य केल्याने संप मागे घेण्यात आला असला तरी शुक्रवारी (दि.२९) सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारमध्ये एका एसटी चालकाने बसच्या शिडीला गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, एसटी कर्मचार्‍या संपात ते सहभागी झाले होते. दिलीप हरिभाऊ काकडे (वय ५६) असे मृत्यू झालेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे.

संपामुळे सर्व बस शेवगाव आगार डेपोत लावण्यात आल्या होत्या. काकडे हे मुक्कामी बस घेऊन आले होते. त्यांनीही संपात सहभाग घेतला होता. मात्र, शुक्रवारी सकाळा बस (एमएच ४० एन ८८४९)च्या शिडीला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. ही बाब डेपोतील कर्मचार्‍यांना समजताच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. काकडे हे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सदस्य आहेत. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. घटनास्थळी पोलिसांनी सुसाईड नोट आढळून आलेली नाही.