घरमहाराष्ट्रशस्त्रक्रियेनंतर 'ऐमान'चा होणार 'अमन'!

शस्त्रक्रियेनंतर ‘ऐमान’चा होणार ‘अमन’!

Subscribe

बीडच्या माजलगावमध्ये राहणाऱ्या ऐमान या ५ वर्षीय मुलीवर लवकरच लिंग दुरुस्ती शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानंतर ऐमानचा 'अमन' होणार आहे.

ललित साळवे यांच्या लिंग परिवर्तन शस्त्रक्रियेनंतर एकंदरच आता या विषयाबाबतची जनजागृती वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. दरम्यान लिंग दुरुस्ती शस्त्रक्रियेसाठी बीडमधील एका मुलीला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ऐमान असं या ५ वर्षीय मुलीचं नाव असून ती बीडच्या माजलगावमध्ये राहणारी आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजता ऐमान तिच्या वडिलांसोबत रुग्णालयात दाखल झाली. ऐमानच्या सर्व वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या असून लवकरच तिच्यावर लिंग दुरुस्तीची शस्त्रक्रिया पार पडणार आहे. आज पार पडलेल्या तिच्या अंल्ट्रासाऊंड चाचणीनंतर डॉक्टरांनी तिला रुग्णालयात अॅडमिट करण्याचा सल्ला दिला आहे.

कधी झाला ‘मुलगा’ असल्याचा उलगडा?

ऐमान ३ वर्षांची असताना तिला लघवीच्या जागी सतत खाज यायची. त्यामुळे ऐमानचे वडिल सय्यद खान यांनी तिला डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बीडमधील डॉक्टरांनी तिच्यात मुलांसारखे हार्मोन्स असल्याचं सांगितलं. त्यातच ललित साळवे यांच्या केसबद्दल तिच्या वडिलांना माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी ऐमानला सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टरांना दाखवण्याचा निर्णय घेतला. ही सर्व माहिती ऐमानचे काका अकबर शेख यांनी ‘माय महानगर‘शी बोलताना दिली. दरम्यान सेंट जॉर्जमधील डॉक्टरांनी ऐमान मुलगी नसून मुलगा असल्याचा शिक्का मोर्तब केला आणि तिच्यावर लिंग दुरुस्ती शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. ऐमान आता अमन नावाने ओळखली जाणार आहे. तिच्या आधारकार्डाची प्रक्रिया देखील आता पूर्ण झाली आहे. शिवाय या  शस्त्रक्रियेनंतर पुन्हा तीन महिन्यांनी तिला चेकअपसाठी यावं लागणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

“ऐमानचं अंल्ट्रासाऊंड करण्यात आलं आहे. रिपोर्ट आल्यानंतर नातेवाईकांच्या सल्ल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल. त्यानंतर ती मुलगा म्हणून आयुष्य जगेल”.– डॉ. रजत कपूर, प्लास्टिक सर्जन, सेंट जॉर्ज रुग्णालय

“आम्ही ऐमानला बीडच्या एका स्कीन स्पेशालिस्ट डॉक्टरला दाखवलं. त्यांनी तिच्या रक्त चाचण्या करायला सांगितल्या. अशा ८ ते‌ ९ चाचण्या झाल्या. या चाचण्यांच्या रिपोर्टनंतर ती एक मुलगा आहे असं कळलं. दरम्यान ललितमुळे लिंग शस्त्रक्रियेसाठी आम्ही इथे येण्याचा निर्णय घेतला.” सय्यद खान, ऐमानचे वडिल

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -