एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतर विरोधक आक्रमक; सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

pravin-darekar-devendra-fadnavis

एसटी कर्मचाऱ्यांना मागच्या दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे राज्यातील दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणावर आता विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला आहे. तर फडणवीस यांनी दोन एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येसाठी जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणार? सरकार या आत्महत्यांची जबाबदारी स्वीकारणार का? असा प्रश्न विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन सरकारवर टीका केली आहे. “वेतन न मिळाल्याने २ एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या करावी लागली, हे अतिशय वेदनादायी, मनाला अस्वस्थ करणारे आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा आणि वेतनासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करुन सुद्धा राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही २ कुटुंब उघड्यावर आली आहेत.”, असे ट्विट फडणवीस यांनी केले.

दिवाळीपर्यंत एसटी कामगारांचे थकीत वेतन देण्यात यावे, अशी मागणी एसटी कामगारांनी लावून धरली आहे. तत्पूर्वी रत्नागिरी डेपो येथे काम करणाऱ्या बीड येथील कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. तर जळगाव येथे देखील एका कर्मचाऱ्याने वेतन थकीत असल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केली.