घरताज्या घडामोडीST workers on silver Oak : शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर हल्ला हे...

ST workers on silver Oak : शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर हल्ला हे पोलीस गुप्तचर यंत्रणेच अपयश

Subscribe

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे दक्षिण मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे आज एसटी संपकरी आंदोलनकर्त्यांनी हल्ला केला. दगड, चप्पल फेकून झालेल्या हल्ल्यामुळे मुंबईतील पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मोठ्या प्रमाणात संपकरी हे सिल्व्हर ओकवर दाखल होत असताना पोलीस यंत्रणेला याबाबतची कोणतीही खबर लागली नाही. त्यामुळेच राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचे हे अपयश असल्याची टीका यानिमित्ताने होऊ लागली आहे. एकाचवेळी शेकडो आंदोलनकर्ते शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात घोषणा देत चप्पल, दगडफेक करत हल्ला केला. त्यामुळेच अचानक झालेल्या हल्ल्याने एकच खळबळ उडाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी गेल्या पाच महिन्यापासून ठिय्या आंदोलन करत आहेत.

या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. तर खासदार सुप्रिय सुळे यांनी माझे आई, बाबा आणि मुलगी घरी आहेत, त्यांच्या सुरक्षेची काळजी मला पहिल्यांदा घेऊद्या अशी प्रतिक्रिया घरावरील हल्ल्यानंतर दिली. हल्ल्याच्या वेळी शरद पवार हे पत्नी तसेच मुलगी सुप्रिया आणि नात यांच्यासोबत घरी होते. आंदोलनकर्त्यांनी हल्ला केल्याचे कळताच खुद्द सुप्रिया सुळे या घराबाहेर पडल्या आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांना हात जोडून आवाहन केले. अशा पद्धतीने कोणतीच चर्चा होणार नाही. शांततेच्या मार्गाने चर्चा केली तरच मीदेखील चर्चेला तयार होईन असे त्यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत पोलिसांनी बसने पुन्हा आझाद मैदान परिसरात आणले.

- Advertisement -

पण या आंदोलनामुळे शरद पवार यांच्या घराबाहेरील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच संपकरी हे इतक्या मोठ्या प्रमाणात सिल्वर ओकवर जमा होत असताना राज्याच्या गुप्तचर यंत्रणेला काहीच थांगपत्ता लागला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे. या घटनेमध्ये कोणत्या तरी अज्ञात व्यक्तीचा हात असल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

- Advertisement -

गृहमंत्री सिल्वर ओकवर

दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यानंतर थेट सिल्व्हर ओक गाठले. त्यांनी घटनास्थळी धाव घेत या घडलेल्या प्रकाराबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी ही भेट घेतली असल्याचे कळते. तसेच आदित्य ठाकरे हेदेखील सिल्वर ओकवर दाखल झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी या हल्ल्याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये हाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या आदरणीय पवारसाहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे अशा तीव्र शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे. अनेक राष्ट्रवादीनचे नेते हे सिल्वर ओकवर दाखल व्हायला सुरूवात झाली आहे.

आझाद मैदान सील

एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानातून थेट सिल्व्हर ओक गाठल्याने पोलीस यंत्रणेची मोठी तारांबळ उडाली आहे. त्यामुळेच सिल्वर ओकवरून आझाद मैदान येथे आणण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच आझाद मैदान सील करण्यात आले असल्याची माहिती आहे. याठिकाणी आझाद मैदानातून कोणालाही आत बाहेर जाण्यासाठी परवागनी देण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणानंतर याठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मंत्रालयासमोरील घराबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.


ST Workers : माझ्या घरावर मोठा हल्ला झालाय, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर सुप्रिया सुळेंनी जोडले हात

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -