एसटीची ऐतिहासिक पगारवाढ कर्मचार्‍यांचा संप मात्र कायम आज निर्णयाची शक्यता!

ST workers at Azad Maidan protesting against State Govt hc hearing on 20 december

मुंबई – राज्य सरकारने बुधवारी एसटी कर्मचार्‍यांसाठी ऐतिहासिक पगारवाढ जाहीर केली. परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एसटी कर्मचार्‍यांचे प्रतिनिधी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेत या पगारवाढीची घोषणा केली. त्यानुसार, एसटी कर्मचार्‍यांच्या एकूण पगारात सरासरी ४१ टक्क्यांची वाढ होणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

तसेच कोर्टाच्या निर्णयानुसार स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालानंतर विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांनी तातडीने कामावर हजर रहावे, असे आवाहनही परब यांनी केले. मात्र, चर्चेदरम्यान, अटीशर्थी मान्य करणार्‍या खोत, पडळकर यांनी याबाबत कर्मचार्‍यांसोबत चर्चा करून मगच संपाबाबत निर्णय घेऊ असे सांगत, पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. त्यानंतर खोत आणि पडळकर हे आझाद मैदानात गेले.

तेथे कर्मचार्‍यांना संबोधित करताना रात्रभर आपण विचार करून उद्या सकाळी निर्णय जाहीर करू, असे त्यांनी कर्मचार्‍यांना सांगितले. त्यामुळे कर्मचार्‍यांचा संप कायम असून गुरुवारी सकाळी ९.३० वाजता संपाबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.