घरमहाराष्ट्रएसटी संपाचा तिढा कायम, २३८ कर्मचार्‍यांची सेवा समाप्त तर २७७६ हजार निलंबित

एसटी संपाचा तिढा कायम, २३८ कर्मचार्‍यांची सेवा समाप्त तर २७७६ हजार निलंबित

Subscribe

एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या 14 दिवसांपासून आंदोलन करणारे एसटी कर्मचारी आता आक्रमक झालेले असून ते राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. परबांच्या घरावर मोर्चा काढणार्‍या या मोर्चेकर्‍यांना सध्या आझाद मैदानावरच अडवण्यात आले आहे. दरम्यान, अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान मार्ग परिवहन महामंडळानेही संपाची गंभीर दखल घेत काल २३८ रोजंदारीतील कर्मचार्‍यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला. तर २९७ कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केल्याचे सांगण्यात आले. यामुळे निलंबित झालेल्या कर्मचार्‍यांची संख्या २७७६ इतकी झाली आहे.

मागील 2 आठवड्यांपासून लालपरीला ब्रेक लागला आहे. एसटीच्या शासकीय विलीनीकरणासाठी कर्मचारी कामबंद आंदोलनावर ठाम आहेत. आता संप मिटत नाही, म्हणून महामंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. एसटी कर्मचार्‍यांचा संप मिटत नसल्याने आता एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. काल एसटी महामंडळाने 238 रोजंदारी कामगारांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तर संपात सहभागी झालेल्या 297 कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. त्यामुळे आता निलंबित एसटी कर्मचार्‍यांची संख्या 2 हजार 776 इतकी झाली आहे. एसटी संपाला दोन आठवडे झाले तरी तोडगा निघण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत.

- Advertisement -

दिवाळीपासून राज्याची जीवनवाहिनी ठप्प आहे. तर दुसरीकडे एसटीचे कर्मचारी संपावर ठाम आहेत. मुंबईतल्या आझाद मैदानात एसटी कर्मचार्‍यांनी ठाण मांडले आहे. सरकारने संप मागे घेण्याचे आवाहन केले असले तरी कामगारांनी ते धुडकावले आहे. त्यातच राज्यभरातील एसटी कर्मचार्‍यांनी आझाद मैदानात हजर व्हावे असे आवाहन आंदोलक नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी केले आहे. अन्य राज्यांतील परिवहन मंडळांचा अभ्यास करून अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी दिली. मात्र, तरीही कोणताही तोडगा संपात नसल्याचे दिसते. आझाद मैदानावरील आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात मोठी घोषणाबाजी सुरु आहे. सरकार आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असून आम्ही परबांच्या घरावर मोर्चा करणार काढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे आमदार गोपीचंद पडळकरांनी सांगितले.

विलीनीकरण अशक्य – फडणवीस
एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. एसटीच्या विलीनीकरणाची मागणी पूर्ण करण्याची मागणी भाजप नेत्यांकडून होत असताना माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याबरोबरच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य करत विलीनीकरण अशक्य असल्याचे म्हटले आहे. फडणवीस यांनी काल परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबरोबरील बैठकीत कामगारांच्या अडचणी आणि विलीनीकरण याच्यातला मध्यम मार्ग सुचवल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमासाठी नाशिक येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वीच एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी एसटी कर्मचार्‍यांचे शिष्टमंडळ, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते. ही बैठकही कोणत्याही निर्णयाविना संपली होती. पत्रकारांनी फडणवीस यांना छेडले असता त्यांनी कामगारांच्या अडचणी आणि सरकारमध्ये विलीनीकरण यांच्यातील मध्यम मार्ग आपण सुचवला आहे. निर्णय सरकारने घ्यायचा आहे, असे म्हटले.

- Advertisement -

उच्च न्यायालयाच्या निर्देषानुसार निर्णय – परब
एसटी कर्मचार्‍यांनी संप मागे घ्यावा, सरकार कुठेही आठमुठेपणाची भूमिका घेत नाही. उच्च न्यायालयाचा जो काही अहवाल असेल त्यावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. कोणाच्यातरी सांगण्यावरून, भडकवण्यावरून एसटी कर्मचार्‍यांनी स्वत:चे नुकसान करून घेऊ नये, असेही परब यांनी स्पष्ट केले.

उच्च न्यायालयाने एसटीच्य विलीनीकरणासंदर्भात एक समिती नेमली आहे. समितीने यावर 12 आठवड्यात अहवाल द्यायचा आहे. त्या अहवालावर राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे अनिल परब म्हणाले. एसटी कर्मचार्‍यांनी सुरू केलेल्या संपाचा त्रास हा सामान्य लोकांना होत असून संप मागे घ्यावा आणि सामान्यांचा हा त्रास कमी करावा असे अनिल परब यांनी आवाहन केले. विलीनीकरणाचा प्रश्न हा उच्च न्यायालयात असून तो मुद्दा सोडून इतर मुद्यांवर राज्य सरकार चर्चा करायला तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आंदोलन करणे हा कर्मचार्‍यांचा अधिकार आहे. त्यांना जे योग्य वाटत आहे ते करत आहेत. माझे त्यांना आवहन आहे, काही कारवाया झाल्या तर कोणीही त्यांना विचारणार नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही आक्रमक होऊ नका. मी कामगारांशी कुठल्याही प्रकारचा लढा देऊ इच्छित नाही. राजकीय पोळी भाजा; पण पोळी जळणार नाही याची काळजी घ्या, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी महामंडळ आणि सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील महामंडळाच्या मुख्यालयात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर, कर्मचारी संघटनेच्यावतीने हायकोर्टात बाजू मांडणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते उपस्थित होते. विलीनीकरणाबाबत सरकार सकारात्मक वाटत असल्याचे अ‍ॅड. सदावर्ते यांनी म्हटले. विलीनीकरणाबाबत परिवहन मंत्री अनिल परब महाधिवक्त्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती अ‍ॅड. सदावर्ते यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -