घरमहाराष्ट्रएसटीचा संप असताना परिवहनचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह स्कॉटलँडमध्ये करतायत...

एसटीचा संप असताना परिवहनचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह स्कॉटलँडमध्ये करतायत काय?

Subscribe

राज्य सरकारमध्ये एसटीचे विलिनीकरण करावे यासह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा मागील तीन आठवडे संप सुरु आहे. ‘गाव तेथे एसटी’, ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ अशी एसटीची ब्रीदवाक्ये असताना गेले काही दिवस एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा यासाठी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने हे पुढाकार घेताना दिसत आहेत. मात्र, परिवहन खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह हे कुठे आहेत? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची आहे. या मागणीवर चर्चेतून तोडगा निघेल. परंतु, चर्चेसाठी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने हेच पुढाकर घेताना दिसत आहेत. मात्र, परिवहन खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री कार्यलायाचे वरिष्ठ अधिकारी आशिष कुमार सिंह यात कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे आशिष कुमार सिंह कुठे याचा ‘आपलं महानगर’ने शोध घेतला असता ते स्कॉटलँडला असल्याचे समजते.

- Advertisement -

ग्लासगो, स्कॉटलँड येथे पर्यावरण बदलांशी संबंधित COP26 परिषद नुकतीच पार पडली. ३१ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबरपर्यंत परिषद होती. यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव आणि आशिष कुमार सिंह यांच्या पत्नी वल्सा नायर सिंह, पर्यावरण खात्याच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर म्हैसकर हे स्कॉटलँडला गेले आहेत. आशिष कुमार सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करुन परवानगी घेत या अधिकाऱ्यांसोबत स्कॉटलँडला गेल्याचे खात्रिलायकरित्या समजते. आशिष कुमार सिंह यांचा पर्यावरण खात्याशी काहीही संबंध नाही, तरी देखील आशिष कुमार सिंह हे स्कॉटलँडला का गेलेत असा सवाल आता सनदी अधिकाऱ्यांकडूनच विचारला जात आहे. याबाबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून स्कॉटलँड या ठिकाणी आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई सुद्धा गेले आहेत.

COP26 परिषद ३१ ऑक्टोबरपासून सुरू होऊन १२ नोव्हेंबरला संपली. परिषद परिषद संपून चार दिवस झाले. मात्र आशिष कुमार सिंह हे अद्याप भारतात परतले नाहीत. मुळात आशिष कुमार सिंह हे पर्यावरण खात्याशी संबंध नसताना गेलेच कसे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आशिष कुमार सिंह हे केवळ परिवहन खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव नाहीत, तर ते मुख्यमंत्री कार्यलयाचे अतिरिक्त मुख्य सचिव देखील आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शस्त्रक्रियेमुळे रिलायन्स हरकिसनदास रुग्णालयात मानेच्या दुखण्यावर उपचार घेत आहेत. त्यामुळे सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्री कार्यलयाची आणि त्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची असते.

- Advertisement -

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असताना परिवहन खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह स्कॉटलँडमध्ये पिकनिक करत असल्याने सनदी अधिकारी नाराज आहेत. एसटी संपाबाबत आतापर्यंत डझनभर बैठका झाल्या. मात्र, एकाही बैठकीला आशिष कुमार सिंह उपस्थित राहू शकलेले नाहीत. आशिष कुमार सिंह यांनी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांचे प्रधान सचिव म्हणून काम केले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सारख्या स्वच्छ प्रतिमेच्या मुख्यमंत्र्यासोबत काम केल्यामुळे सिंह यांना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आणले गेले आहे. एसटी संपामुळे राज्यात ठाकरे सरकारची कोंडी होत आहे. अशावेळी सिंह यांचा अनुभव कामाला आला असता असे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटते. मात्र, आशिष कुमार सिंह यांची कृती रोम जळत असताना निरो फिडेल वाजवत होता अशीच आहे, असे सरकारमधील काही मंत्र्यांनाही वाटते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -