अनिल परब यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, एसटी संप मिटण्याची शक्यता

Anil Parab and Devendra Fadnavis

ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरू झालेल्या एसटी कर्मचार्‍यांचा संप अद्यापही सुरूच आहे. गेल्या आठवडाभरापासून शेकडो एसटी कर्मचारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोतही मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी फडणवीस यांनी काही सूचना केल्याचे अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

एसटी कर्मचार्‍यांचा तिढा अद्याप संपलेला नाही. कर्मचार्‍यांना सकाळी पुन्हा एकदा आवाहन केले आहे. विलीनीकरणाच्या मुद्यावर हायकोर्टाने नेमलेली कमिटीच निर्णय घेईल. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी राज्याचा कारभार हाकला आहे. त्यांनी एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नाबाबत काही सूचना केल्या आहेत. फडणवीसांच्या सूचनांवर आम्ही विचार करू, असे अनिल परब यांनी सांगितले. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असेही परब म्हणाले.

बेसिक वेतनाचा प्रश्न
आम्ही एसटी कामगारांना वेतनवाढ द्यायला तयार आहोत. पण केवळ प्रश्न बेसिक वेतनाचा आहे. तो चर्चा करून सोडवला जाईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. एसटी कामगारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच निर्णय घेतील, असे अनिल परब यांनी दुपारी सांगितले होते.

रोजंदारी कर्मचार्‍यांना इशारा
रोजंदारी कर्मचार्‍यांना काल नोटीस दिली आहे. आज 24 तासाची वेळ संपत आहे. कोण कामावर येत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. संपकरी कामावर न आल्यास 2016-2017 आणि 2019 च्या भरती प्रक्रियेतील वेटिंगवाल्यांचा विचार करावा लागेल, असे परब म्हणाले.