ST Workers Strike : ‘२४ तासांत कामावर हजर रहा अन्यथा…’ एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांना इशारा

ST Workers Strike attend work otherwise the service ends st corporation notice to st employes maharashtra
ST Workers Strike : '२४ तासांत कामावर हजर रहा अन्यथा...' एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांना इशारा

गेल्या दोन आठवड्यापासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. न्यायालयाने आदेश देऊनही एसटी कर्मचारी हे आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. अशातच एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ पुढे सरसावले आहे. महामंडळाने रोजंदारीवर काम करणाऱ्या तीनशे ते साडे तीनशे कामगारांना एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये एसटी कामगारांना २४ तासांच कामावर हजर व्हा अन्यथा, कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मंगळवारी जवळपास साडेसात हजार एसटी कर्मचारी कामावर पुन्हा हजर झालेत. यामुळे सायंकाळी सहापर्यंत ६६ बसेस राज्याच्या विविध भागांत सोडण्यात आल्या. यातून जवळपास २००० हजार प्रवाशांनी प्रवास केला.

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलनीकरण, वेतन आणि इतर काही मागण्यांसाठी ऑक्टोबरच्या शेवट्या आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या संपाचा फटका सामान्य नागरिकांसह एसटी महामंडळालाही सहन करावा लागतोय. अशातच महामंडळाने कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचे जाहीर केले. यावेळी ७,६२३ कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झालेत. मात्र रोजंदारीवर काम करणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांना आता महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एसटी महामंडळात रोजंदारी स्वरूपातील दिवस भरला तर पगार, अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणूकीचे सुमारे दोन हजार कामगार आहेत. त्यांना महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मात्र अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मुंबईतील आझाद मैदानात आता शेकडोच्या संख्येने एसटी कर्मचारी संप करत आहे. या संपाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांनी देखील पाठींबा दिले आहे.