घरताज्या घडामोडीST Workers Strike: गेल्या ५० वर्षांपासून शरद पवारांनी कर्मचाऱ्यांचा घातच केलाय -...

ST Workers Strike: गेल्या ५० वर्षांपासून शरद पवारांनी कर्मचाऱ्यांचा घातच केलाय – गोपीचंद पडळकर

Subscribe

एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ आज, गुरुवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीस गेले होते. यादरम्यान विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर एसटी कामगारांच्या शिष्टमंडळाच्या विनंतीनंतर फडणवीसांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली. फडणवीसांच्या भेटीनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ‘जोपर्यंत विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही. गेल्या ५० वर्षांपासून शरद पवारांनी कर्मचाऱ्यांचा घातच केलाय,’ असा गंभीर आरोप पडळकर यांनी केला.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, ‘राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काल आम्ही विनंती केली होती की, गेल्या ९ दिवसांपासून आझाद मैदानात एसटी कर्मचारी थंडी, पावसात, उन्हात बसले आहेत. २८ तारखेच्या मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. सरकार याबाबतीत सकारात्मक चर्चा करत नाही. आमचं शिष्टमंडळ तुम्हाला भेटायला येतंय, आम्हाला वेळ द्या. आज आम्हाला वेळं दिली होती. त्यानुसार सदाभाऊ खोत, आमदार मंगेश चव्हाण, महिला-पुरुष कर्मचाऱ्यांनी भेट घेतली. फडणवीस यांना एसटी कामगारांच्या सगळ्या प्रश्नांची जाणीव आहे. आम्ही विनंती केल्यामुळे फडणवीस यांनी अनिल परब यांच्याशी चर्चा केली. जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, ही भूमिका आम्ही त्यांच्याकडे मांडली आहे.’

- Advertisement -

बुलढाण्यातील संपकरी एसटी कर्मचारी विशाल अंबलकर विशप्राशन केल्यामुळे मृत्यू झाला. त्याबाबत पडळकर म्हणाले की, ‘सरकार या संपातून मार्ग काढण्याऐवजी त्यांना भीती दाखवतंय. सेवा समाप्तीच्या नोटीशा देतायत, निलंबनाच्या नोटीशा देतायत. आम्ही सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. पण तुम्ही विलीनीकरणाच्या मुद्द्यावर काही बोलतच नसालं तर यातून मार्ग कसा निघेल? फडणवीसांनी यातून कसा मार्ग निघू शकतो, याबाबत सरकारला मार्गदर्शन केलं आहे. म्हणजे आम्ही नुसतंच विलीनीकरण करा एवढ्याच मुद्द्यावर भांडत नाही, तर त्यातून पर्याय काय आहे, हेही फडणवीसांनी सरकारला सांगितलं आहे. सरकारच्या हातामध्ये आहे, मार्ग काढण्याचा किंवा नाही काढण्याचा. सर्वस्वी निर्णय सरकारकडे आहे.’

विलीनीकरण शक्य नाही आहे, अशा शरद पवारांच्या प्रतिक्रियेवर पडळकर म्हणाले की, ‘गेल्या ५० वर्षांपासून शरद पवारांनी या कर्मचाऱ्यांचा घातच केलायं. त्यांचीच संघटना ही मान्यता प्राप्त संघटना आहे. आतापर्यंत सरकार, परिवहन खातं ही मान्यता प्राप्त संघटनेशी चर्चा करतेय. मान्यता प्राप्त संघटनेने मूळ विषय सरकारपर्यंत मांडले नाहीत. सरकार आणि मान्यता प्राप्त संघटना या दोघांनी हात मिळवणी करून या कर्मचाऱ्यांचा घात केलेला आहे. त्यामुळे १९८० साली शरद पवारांचं एसटी कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनातलं भाषण काढलं तर तेच भाषण आहे, जे २०२० रोजीचं त्यांनी भाषण केलं. देवाच्या कृपेने २०५० पर्यंत ते जगले आणि २०५० साली एसटी कर्मचाऱ्यांचं अधिवेशन झालं त्यातही शरद पवार तेचं भाषण करतील. त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही आहे. त्यांना संघटना बरखास्त होण्याची भीती आहे आणि मग
मतदानासाठी कामगारांना कसं वापरणार ही भीती त्यांना असावी.’

- Advertisement -

हेही वाचा – ST Workers Strike: एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा भयावह विषय : चंद्रकांत पाटील


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -