ST Workers Strike : एसटीच्या संपावर तोडगा काढण्यासाठी अनिल परब, थोरात आणि फडणवीसांमध्ये चर्चा

Anil Parab and Devendra Fadnavis

राज्य सरकारमध्ये एसटीचे विलिनीकरण करावे यासह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा मागील तीन आठवडे संप सुरु आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात अनौपचारिक चर्चा झाली. यावेळी फडणवीसांनी काही सूचना सुचवल्या असून त्याचा विचार केला जाईल, अशी माहिती ॲड. अनिल परब यांनी दिली.

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ॲड. अनिल परब यांनी गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांची सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यानंतर ॲड. अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधताना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत अनौपचारीक चर्चा झाल्याचं सांगितलं. “देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनौपचारिक चर्चेमध्ये त्यांनी देखील काही सूचना केल्या. फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांना देखील राज्याचा कारभार माहिती आहे. त्यांनी ज्या सूचना केल्या त्यावर शासनाचं मत देखील घेऊ असं आम्ही त्यांना सांगितलं,” असं ॲड. अनिल परब म्हणाले.

“एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे. वारंवार आवाहन करतोय की चर्चा करु, चर्चेतून मार्ग निघेल. विलिनीकरणाचा मुद्दा उच्च न्यायालयाने नेमलेल्या समिती समोर आहे. या व्यतिरिक्त ज्या गोष्टींवर चर्चा करायची आहे, त्यासाठी आम्ही सदैव खुले आहोत, कधीही चर्चा होऊ शकते,” असं ॲड. अनिल परब यांनी सांगितलं.

सकारात्मक चर्चेच्या दृष्टीकोनातच सरकार प्रयत्न करतेय. सरकारची कुठलीही एसटी कर्मचाऱ्यांबाबत नकारामत्क भूमिका नाही. फक्त उच्च न्यायालयाच्या समितीसमोर काही प्रश्न आहेत. काही प्रश्न थेट त्यांच्यासोबत बसून सोडवू शकतो, असं ॲड. अनिल परब यांनी सांगितलं.