ST Worker strike: परिवहन मंत्र्यांच्या घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात, Video

ST Workers strike Janshakti sanghatana member try to throw ink on anil parab house
ST Worker strike: परिवहन मंत्र्यांच्या घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी मागील काही दिवसांपासून संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एसटी संपावरुन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाली अखेर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. एसटीचे शासकीय सेवेत विलीनीकरण करण्यात यावे अशी एसटी कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे. तसेच सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ करण्यात यावी या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांसोबत केलेल्या बैठका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत केलेल्या बैठका निष्फळ ठरल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवलं आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा आक्रमक पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला विरोधी पक्ष भाजप आणि विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. एसटीच्या संपावरुन जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी संतापून थेट परिहवहन मंत्री अनिल परब यांच्या मुंबईतील शासकिय निवासस्थानावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला.

जनशक्ती संघटनेचे ४ ते ५ कार्यकर्ते परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुंबईतील शासकिय घराबाहेर पोहचले होते. त्यांनी घोषणाबाजी करत घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, झटापट झाली. अखेर पोलिसांनी प्रकरण आटोक्यात आणलं आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. कार्यकर्त्यांनी सोबत काळी शाई आणली होती. परबांच्या घराबाहेर ही शाई फेकण्यात आली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात घोषणाबाजी सुरु झाली आहे. तसेच परबांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा या पुर्वीही कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यामुळे अनिल परब यांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असला तरी हे कार्यकर्ते लपून छपून अनिल परबांच्या घराबाहेर पोहचले. कार्यकर्त्यांनी घरावर शाई फेक करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.


हेही वाचा : केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी २६ नोव्हेंबरला शेतकरी दिल्लीकडे मोर्चा काढण्याच्या तयारीत