आमचं सरकार असताना कुठे झाले विलीनीकरण, जनतेनं हुशार व्हावं, जानकरांचा भाजपला घरचा आहेर

st workers strike mahadev jankar said st workers should understand politics behind st merger in government
आमचं सरकार असताना कुठे झाले विलीनीकरण, जनतेनं हुशार व्हावं, जानकरांचा भाजपला घरचा आहेर

राज्यातील एसटी कर्मचारी १० ते १५ दिवसांपासून संपावर आहेत. एसटीचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे अशी आग्रही मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या संपाला भाजपच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. परंतु रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी या संपावरुन भाजपला घरचा आहेर दिला आहे. तत्कालीन भाजप-युती सरकारदरम्यान एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला होता परंतु तेव्हा कुठे झाले विलीनीकरण, यावर एकच पर्याय आहे ते म्हणजे जनतेनं हुशार झाले पाहिजे असं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलं आहे. एकप्रकारे जानकर यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे गेल्या काही दिवसांपासून मुंबईती आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना भेटण्यासाठी रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर गेले होते. यावेळी जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आमचे सरकार असतानाही एसटी विलीनीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हा कुठे विलीनीकरण झाले. रस्त्यावर असताना एक बोलायला लागते आणि आत गेल्यावर वेगळं असते. हा सिस्टीमचा भाग असल्यामुळे जनतेनं हुशार झालं पाहिजे हा त्यावर पर्याय असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे भाजप सरकारमध्येही होते. तसेच ते भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे निकवर्तीय आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजपने सहभाग घेतला आहे. मात्र जानकर यांच्या वक्तव्यामुळे भाजपला घरचा आहेर दिला असल्याचे दिसतं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपच्या बड्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. आझाद मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनात आतापर्यंत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार आशिष शेलार आणि इतर नेते देखील सहभागी झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विलीनीकरण करण्यात यावे, सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.


हेही वाचा : Drugs Case: नवाब मलिकांच्या जावयाची उच्च न्यायालयात धाव, गुन्हा रद्द करण्याची केली मागणी