घरताज्या घडामोडीनायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाविरोधात स्थायी समिती बैठक तहकूब

नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाविरोधात स्थायी समिती बैठक तहकूब

Subscribe

वरळी येथील गॅस सिलिंडर स्फोटातील जखमींवर उपचार करण्यात नायर रुग्णालयात अक्षम्य हलगर्जीपणा होऊन एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याने या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले.
पहारेकरी भाजपने या घटनेच्या निषेधार्थ सभा तहकुबी मांडली तर सत्ताधारी शिवसेनेने झटपट सभा तहकुबी मांडली. अखेर साधकबाधक चर्चेअंती स्थायी समितीची बैठक कोणतेही कामकाज न करता एकमताने झटपट तहकूब करण्यात आली.

वरळी येथील बीडीडी चाळीत मंगळवारी झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात आनंद पुरी (२७), मंगेश पुरी (४ महिने), विद्या पुरी (२५) आणि विष्णू पुरी (५) हे चौघेजण जखमी झाले होते. त्यापैकी आनंद पुरी व मंगेश पुरी हे गंभीर जखमी होते. मात्र त्यांना उपचारासाठी नायर रुग्णालयात नेले असताना त्यावेळी उपस्थित डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांनी त्यांना तात्काळ उपचार देण्यात अक्षम्य हलगर्जीपणा केला, असा आरोप करण्यात येत असून त्याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्याची गंभीर दखल घेऊन भाजपने सदर घटनेप्रकरणी चौकशी करून कडक कारवाईची मागणी केली होती. तर रूग्णालय प्रशासनानेही याप्रकरणी उपअधिष्ठाता यांच्यामार्फत चौकशी करण्याची घोषणा केली होती.

- Advertisement -

भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, पालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने गुरुवारी नायर रुग्णालयात भेट देऊन रूग्णालय प्रशासनाकडून सखोल माहिती जाणून घेत याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, याप्रकरणी करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत नायर रुग्णालयातील दोन डॉक्टर, एक नर्स यांना दोषी ठरवून त्यांना गुरुवारी तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
या घटनेचे पडसाद शुक्रवारी पालिका मुख्यालयात पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. या घटनेप्रकरणी सभा तहकुबी मांडण्यात सत्ताधारी शिवसेना व भाजप यांच्यात चढाओढ बघायला मिळाली. भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी, याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेत सदर घटनाप्रकाराला वाचा फोडली.

मुंबई महापालिका दरवर्षी रूग्णालय, प्रसुतीगृहे, दवाखाने येथे नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मात्र प्रत्यक्षात काही रुग्णालयात रुग्णांना चुकीची वागणूक दिली जाते, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तर सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनीही सदर घटना दुर्दैवी असून नायर रुग्णालयात रुग्णसेवेत झालेल्या हलगर्जीपणाचा त्यांनी निषेध व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -