Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची आज मराठवाड्यात बैठक; 40 हजार कोटींचे पॅकेज?

राज्य मंत्रिमंडळाची आज मराठवाड्यात बैठक; 40 हजार कोटींचे पॅकेज?

Subscribe

मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे सावट आहे. जालना येथील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आंदोलन सुरू होते. उपोषण संपले असले तरी त्याठिकाणी झालेल्या लाठीमारामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची ही बैठक होत आहे.

मुंबई : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्ताने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. जवळपास सात वर्षांनंतर मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात होत आहे. सात वर्षांपूर्वी झालेल्या बैठकीत 50 हजार कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली होती. आता आज होणाऱ्या बैठकीत मराठवाड्यासाठी तब्बल 40 हजार कोटींहून अधिक रकमेचे प्रस्ताव मान्यतेसाठी मांडले जाणार असल्याचे समजते. मराठवाड्यातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे विविध जलसिंचन प्रकल्पांसाठी 21 हजार कोटींची तरतूद आहे. या बैठकीत कृषी विभागासाठीही 600 कोटींचे प्रस्ताव येणार असल्याचे समजते. मात्र, विरोधी पक्षांकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने मंत्र्यांसाठी करण्यात आलेल्या पंचतारांकित बडदास्तीवर टीका केली आहे.

मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे सावट आहे. जालना येथील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आंदोलन सुरू होते. उपोषण संपले असले तरी त्याठिकाणी झालेल्या लाठीमारामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. या बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी 40 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते. गेल्या आठवडाभरापासून मंत्रालयात विविध विभागांकडून प्रस्ताव तयार करण्याची लगबग सुरू होती. हे प्रस्ताव मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आले आहेत.

- Advertisement -

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार संयुक्त पत्रकार परिषदेत मराठवाड्यासाठी घेण्यात आलेल्या महत्वाच्या निर्णयांची घोषणा करतील. राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ, प्रधान सचिवांपासून विविध विभागांचे सचिव, उपसचिव, सहसचिव, विविध मंत्र्यांचे स्वीय सहायक, सुरक्षा यंत्रणा यासह सर्व जवळपास 500 जणांचा ताफा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होत आहे. बैठकीच्या निमित्ताने येणाऱ्या व्यक्तींसाठी शेकडो वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय शासनाची शहरातील सर्व विश्रामगृहे कमी पडत असल्याने सर्वोत्तम व्यवस्था असलेली पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहेत.

महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन: विजय वडेट्टीवार

मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने जी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे त्यात एका थाळीची किंमत 1 हजार ते दीड हजार रुपये असणार आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागासाठी मंत्रिमंडळ बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन ? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी करत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.आतापर्यंत मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकांची पंरपरा ट्रिपल इंजिन सरकारने मोडीत काढली आहे. मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांचा मुक्काम हा सुभेदारी या शासकीय विश्रामगृहात असायचा. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुक्काम 32 हजार रूपये भाडे असलेल्या अलिशान हॉटेलमध्ये असणार आहे, असा दावा त्यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – दुष्काळग्रस्त मराठवाड्यात शिंदे-फडणवीस-पवार मंत्रिमंडळासाठी पंचतारांकित बडदास्त

दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ : नाना पटोले

राज्यातील शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करत आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड वाढलेल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. मराठवाड्यासह राज्यात एवढी गंभीर परिस्थिती असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकाऱ्यांची जनतेच्या पैशातून अलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये बडदास्त ठेवली आहे. सर्वसामान्य जनता महागाईत होरपळत असताना मंत्रिमंडळ बैठकीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणे हा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

- Advertisment -