राज्य महिला आयोगाच्या नव्या सदस्यांची नियुक्ती

राज्य सरकारने राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणांची नियुक्ती केली आहे. नियुक्तीची अधिसूचना ही १३ सप्टेंबर २०१९ रोजी राजपत्रात प्रसिद्ध झालेली आहे.

state commission for woman appoint new members
'राज्य महिला आयोगा'ला नवे सदस्य

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. त्यामध्ये चंद्रिका चौहान (सोलापूर), अनुसया गुप्ता (नागपूर), ज्योती भोये (जव्हार, जि. पालघर), रोहिणी नायडू (नाशिक), रिदा रशीद (मुंबई) आणि गयाताई कराड (परळी, जि. बीड) यांचा समावेश आहे. यापैकी गयाताई कराड यांची फेरनियुक्ती आहे. आयोगाच्या अध्यक्षपदी श्रीमती विजया रहाटकर यांची यापूर्वीच फेरनियुक्ती झालेली आहे. नव्या सदस्यांच्या नियुक्तीची अधिसूचना १३ सप्टेंबर २०१९ रोजी राजपत्रात प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ नुसार आयोगामध्ये सात सदस्य असतात. त्यानुसार सातही सदस्यांची नियुक्ती आता झालेली आहे. याशिवाय राज्याचे पोलीस महासंचालक हे आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. त्यानुसार पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल हे ही आयोगाचे सदस्य आहेत.

जाणून घ्या या नव्या सदस्यांविषयी

सोलापूरच्या चंद्रिका चौहान या ‘उद्योगवर्धिनी’ संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी दीर्घकाळ कार्यरत आहेत. नागपूरच्या अनुसया गुप्ता या महिला दक्षता समिती, ‘लोकपंचायत’च्या माध्यमातून सक्रिय आहेत. जव्हारच्या ज्योती भोये या पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत. आदिवासी महिलांसाठीचे त्यांचे काम आहे.

आयोगाच्या कामाला आणि वेगाला आणखी गती

नाशिकच्या रोहिणी नायडू या अनेक सामाजिक संस्थाशी निगडीत आहेत. विशेषत: आरोग्य क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे. मुंबईच्या रिदा रशीद यांनी अल्पसंख्यांक समूहातील महिलांसाठी उत्तम काम केले आहे. शिक्षण आणि कौशल्य यावर त्यांचा भर असतो. गयाताई कराड या ही मराठवाडयातील महिलांसाठी कार्यरत आहेत. या नव्या सदस्यांचे अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्वागत केले आहे. आयोगाच्या कामाला आणि वेगाला आणखी गती मिळेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.