उमेदवारांनो, जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करुन घ्या – राज्य निवडणूक आयुक्तांचे आवाहन

जातवैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसह जात पडताळणी समितीकडे अर्ज करावा.

election commission gave extension to submit caste certificate in up Gram Panchayat elections
उमेदवारांनो, जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करुन घ्या - राज्य निवडणूक आयुक्तांचे आवाहन

स्थानिक स्वराज्य संस्थेचे २०२२ मधील निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्या असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुका राखीव जागांवर लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी जात प्रमाणपत्रासह जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित उमेदवाराने आतापासूनच वैयक्तिक स्तरावर सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन आपले जातवैधता प्रामणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केले आहे.

राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले की, राज्यभरातील महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समिती व ग्रामपंचायती या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळात मोठ्याप्रमाणावर निवडणुका होणार आहेत. संबधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या कायद्यानुसार राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. त्यासाठी इच्छूक उमेदवारांनी प्रथमत: जात प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे.

त्यानंतर जातवैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसह जात पडताळणी समितीकडे अर्ज करावा. त्यादृष्टीने आतापासूनच संबंधितांनी तयारी करणे आवश्यक आहे. जेणे करून नामनिर्देशनपत्र सादर करताना ऐनवेळी कोणाचीही धावपळ होणार नाही आणि एकही इच्छूक उमेदवार जातवैधता प्रमाणपत्राअभावी निवडणूक लढविण्यापासून वंचित राहणार नाही असे राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : राज्याचा गृहमंत्रीच ED ला येडा समजतो, राज ठाकरेंनी उडवली देशमुखांची खिल्ली