घरपालघर'थर्टी फर्स्ट' सेलिब्रेशनवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर

‘थर्टी फर्स्ट’ सेलिब्रेशनवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर

Subscribe

वसई (शशी करपे) : पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असलेले रिसॉर्ट आणि फार्महाऊसह इमारतींच्या टेरेसवर होणाऱ्या थर्टीफस्टच्या पार्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक करडी नजर ठेऊन असणार आहे. उत्पादन शुल्क विभागाचा परवाना न घेताच होणाऱ्या पार्ट्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रिसॉर्टस आणि फार्महाऊस आहेत. थर्टीफस्टच्या निमित्ताने दरवर्षी हे रिसॉर्ट आणि फार्महाऊस महिनाभर आधीच बुक झालेले असतात. त्याठिकाणी मनोरंजनासह दारूच्या पार्ट्या होत असतात. त्यामुळे याही वेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचबरोबर शहरातील इमारती तसेच गावातील घरांमध्ये होणाऱ्या दारू पार्ट्यांवरही भरारी पथक लक्ष ठेऊन आहे.

- Advertisement -

रिसॉर्टमध्ये बेकायदेशीरपणे दारूविक्री केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यावर स्थानिक पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाई करत नसल्याने वसई तालुका बार असोसिएशनने याप्रकरणी थेट वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या होत्या. बार असोसिएशनचे सभासद सरकारी परवाना घेऊन दारू विकत असताना रिसॉर्टमध्ये मात्र कोणतीही परवानगी नसताना खुलेआम दारुविक्री होत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्याची दखल घेत दोन महिन्यांपूर्वी भरारी पथकाने राजोडी येथील थेट समुद्रातच बेकायदेशीरपणे हॉटेल थाटून गोव्याच्या धर्तीवर सुरू असलेल्या एका बड्या नेत्याच्या बारवर कारवाई केली होती. त्यावेळी याठिकाणी बंदी असलेला गोवा बनावटीचा दारूचा साठाही जप्त करण्यात आला होता. त्यामुळे यावेळी भरारी पथकाने सर्वच रिसॉर्टवर करडी नजर ठेवली आहे.

थर्टीफर्स्टची पार्टी असेल तर परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्य-मेजवान्यांचे आयोजन करण्यासाठी एक दिवसाचा मद्य परवाना अनिवार्य करण्यात आला आहे. व्यावसायिक मेजवान्यांसाठी प्रतिदिन 20 हजार तर घरगुती मेजवान्यांसाठी सदस्यांच्या संख्येनुसार 10 ते 13 हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. विनापरवाना मेजवान्यांमध्ये मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

- Advertisement -

31 डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे जल्लोषात स्वागत होते. अशांवर विशेष लक्ष असणार आहे. परवाना न काढता मद्यपार्टी करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. घराच्या गच्चीवर किंवा खासगी मेजवान्या असतील तर सदस्य उपस्थित राहणार त्यांच्या संख्येनुसार परवाना काढावा लागणार आहे. अन्यथा कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे नववर्षाच्या स्वागताच्या पार्ट्या होऊ शकला नव्हत्या. पण, यंदा सर्वच उत्सवांना परवानगी दिली गेल्याने नववर्षांसाठी रिसॉर्ट आणि फॉर्महाऊस सज्ज झाले आहेत. एरव्ही सातशे ते नऊशे रुपये प्रवेश असलेल्या रिसॉर्टचे दर दोन ते तीन पट करण्यात आले आहेत. त्यानंतरही येथील रिसॉर्ट आणि फॉर्महाऊस फुल्ल झाली आहेत.

‘थर्टी फर्स्ट’ सेलिब्रेशनवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -