– प्रेमानंद बच्छाव
मुंबई : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना शिंदे गटात तीव्र असंतोष असताना उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्हा नियोजन समितीतून शिंदे गटाला बेदखल करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीमधील नामनिर्देशित सदस्यांच्या यादीत शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराला स्थान न देण्यात आल्याने शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पालकमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटातील नाराजी दूर झालेली नसताना राज्य सरकारने मंगळवारी (28 जानेवारी) जिल्हा नियोजन समित्यांवरील राजकीय नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर बुधवारी (29 जानेवारी) लगेचच पुणे आणि बीड जिल्ह्यातील नामनिर्देशित सदस्यांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या. (state government cancelled pune district planning committee shivsena eknath shinde)
नियोजन विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला. त्यानुसार पुणे जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके तसेच भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात विधानसभेचे 21 आमदार आहेत. यापैकी पुरंदरमधून शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे हे एकमेव आमदार निवडून आले आहेत. मात्र, शिवतारे यांना नामनिर्देशित सदस्य म्हणून पुणे जिल्हा नियोजन समितीवर स्थान देण्यात आलेले नाही. शिवतारे आणि अजित पवार यांच्यात फारसे राजकीय सख्य नाही. त्यामुळे विजय शिवतारे यांना डावलण्यात आल्याची चर्चा आहे.
दरम्यान, बीड जिल्हा नियोजन समितीवरील नामनिर्देशित सदस्य म्हणून भाजपच्या आमदार नमिता मुंदडा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विजयसिंह शिवाजीराव पंडित यांना स्थान देण्यात आले आहे. अजित पवार हे गुरुवारी बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर बैठकीआधी घाईघाईने बुधवारी शासन निर्णय जारी करण्यात आले. दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीत आरोप -प्रत्यारोप सुरू असताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी बुधवारी देवगिरीवर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, शिंदे गटाच्या आमदारांची पवारांसोबत बुधवारी भेट होऊ शकली नाही.