Corona Virus : कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना २० कोटींचा निधी वितरित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

कोरोनात दोन्ही पालक गमावलेल्या मुला-मुलींना आर्थिक मदत देण्यासाठी महिला आणि बालकल्याण विभागाने २० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांची जबाबदारी राज्य सरकारने उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून हा निधी वितरित करण्यात आला आहे.

कोरोना प्रादुर्भावात राज्यात ४०० हून अधिक बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत. तर १३ हजारांहून अधिक बालकांनी एक पालक गमावला आहे. कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची शाळेची फी भरण्याची जबाबदारीही राज्य सरकारने घेतली आहे. कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शालेय शुल्काची जबाबदारी आणि मुलांच्या समुपदेशनाची मोहीम स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबवली जाणार आहे.

अनाथ बालकांच्या खात्यावर राज्य सरकारमार्फत ५ लाख रुपये मुदत ठेव स्वरुपात ठेवण्यात येईल. ही रक्कम जिल्हा महिला आणि बालविकास अधिका-यांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात येणार असून बालक १८ वर्षाचे झाल्यानंतर व्याजासह त्याला ही रक्कम देण्यात येईल. तोपर्यंत दैनंदिन खर्चाच्या अनुषंगाने बालसंगोपन योजनेचा लाभ या बालकांना देण्यात येईल. तसेच या बालकांची मालमत्ता तसेच इतर कायदेशीर हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारीदेखील टास्क फोर्सच्या माध्यमातून उचलण्यात येत आहे.


हेही वाचा : Nitesh Rane : नितेश राणेंच्या जामीन अर्जावर उद्या निकाल, जामिनाबाबत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण