घरमहाराष्ट्रसर्व दुकाने रात्री ११ पर्यंत, बार-रेस्टॉरंट रात्री १२ पर्यंत

सर्व दुकाने रात्री ११ पर्यंत, बार-रेस्टॉरंट रात्री १२ पर्यंत

Subscribe

मुंबईत आजपासून नाईट लाईफ सुरु

राज्यातील दुकाने आणि बार, रेस्टॉरंटच्या वेळेत वाढ करणारा आदेश मंगळवारी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या सहीने जारी करण्यात आला. त्यानुसार दुकान रात्री ११ तर हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट रात्री १२ पर्यंत खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. हा निर्णय तात्काळ अंमलात येणार आहे. आपत्ती प्राधिकरणाने दुकान आणि रेस्टॉरंटच्या वेळा निश्चित केल्या असल्या तरीही स्थानिक प्रशासनाला या वेळेत सवलत देण्याचे किंवा निर्बंध लागू करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल, सोमवारी कोरोना कृती दलाची बैठक घेतली होती. या बैठकीत कोरोनाचा विळखा सैल झाल्याने दुकाने, हॉटेल, बार आणि रेस्टॉरंटची वेळ वाढवून देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आज आदेश जारी करण्यात आला. सध्या दुकान हॉटेलसाठी रात्री १० वाजेपर्यंतची वेळ आहे.

- Advertisement -

यापूर्वी लावलेल्या निर्बंधांमध्ये कोणतीही सवलत देण्यात येणार नसून फक्त रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ पुरविणारे हॉटेल यांच्यासाठीच रात्री १२ पर्यंत आपले आस्थापन चालू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे इतर आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत चालू राहतील. स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये स्थानिक आवश्यकतेनुसार निर्बंध लावू शकते किंवा सवलत देऊ शकते, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने आदेशात नमूद केले आहे.

दुकाने आणि रेस्टॉरंटची वेळ वाढवून देताना राज्यात लागू असलेल्या कोरोना विषयक मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन नागरिक आणि आस्थापनांना करावे लागणार आहे. पूर्णपणे लसीकरण, गर्दीच्या क्षमतेवर निर्बंध, हे परिस्थितीनुसार लागू राहील. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल्स आदी सार्वजनिक ठिकाणी लोकांची जास्त गर्दी होण्याची शक्यता लक्षात ठेवून हा वेळ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -