करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय!

राज्य सरकारने करोनाचा फैलाव रोखण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ५० टक्के क्षमतेनेच चालवण्याच्या सूचना देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

राज्यात करोनाग्रस्त रुग्णांची संऱ्या ४०च्या वर गेल्यामुळे करोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यातच आता राज्य सरकारने करोनाचा फैलाव रोखण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये, राज्यातली सरकारी कार्यालयं निम्म्या क्षमतेने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, राज्यातल्या सरकारी कार्यालयांमध्ये फक्त ५० टक्के कर्मचारीच कामावर असतील. त्यानुसार कर्मचारी एक दिवसाआड कार्यालयात येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय, रेल्वे, एसटी बसेस, खासगी बसेस, मेट्रो अशा प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक सेवा देखील ५० टक्के प्रवासी क्षमतेनेच चालवण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात हे नमूद केलं आहे.

state government notification on corona


हेही वाचा – उद्यापासून ‘या’ तीन ठिकाणी होणार करोनाची चाचणी!

दरम्यान, मुंबईच्या बेस्ट संदर्भात देखील काही निर्देश देण्यात आले असून बेस्ट बसमध्ये उभे राहणारे प्रवासी बंद करण्यात येतील असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्याशिवाय, बसमध्ये बसणारे प्रवासी लांब अंतरावर बसतील, यासाठी देखील सूचना देण्यात येणार आहेत. त्यासाठी बसेसची संख्या वाढवण्यासाठी पर्यायी बसेसची व्यवस्था केली जाणार आहे.

दुकानांच्या वेळा ठरविणार

शहरातील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील की, सर्व दुकाने अंतरा अंतराने सकाळी व दुपारी सुरु होतील. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्यात येईल.

साधनसामुग्रीची उपलब्धता

दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध राहील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आवश्यक तेवढ्या अलगीकरण कक्ष व विलगीकरण कक्षांची सोय करण्यात आली आहे. आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामुग्री देखील उपलब्ध आहेत. ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. परिसरात किंवा इतरत्र फिरू नये. अशा व्यक्तींवर शासनाचे लक्ष असून होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती जर बाहेर फिरताना आढळली तर तिला सक्तीने रुग्णालयात भरती करण्यात येईल.

जीवनावश्यक वस्तुंचा साठा करू नये

जनतेने जीवनावश्यक वस्तुंचा, अन्नधान्य, औषधी यांचा साठा करू नये. राज्यातील जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व सुरळीत असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन जर कोणी व्यापारी साठेबाजी करीत असेल किंवा औषधांच्या, मास्कच्या किंमती अव्वाच्या सव्वा लावत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.