घरमहाराष्ट्रराज्यपालांचा विमानातून पायउतार, ठाकरे सरकारचा 'प्रीप्लॅन'

राज्यपालांचा विमानातून पायउतार, ठाकरे सरकारचा ‘प्रीप्लॅन’

Subscribe

राजभवनावर अर्धवट आणि अस्पष्ट निरोप देण्यामागे सनदी अधिकारी असल्याचे समजतंय.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना गुरुवारी सकाळी मसुरी येथील कार्यक्रमासाठी जाण्याकरता राज्य सरकारने विमान नाकारलं. विमानातून अक्षरशः पायउतार व्हावं लागलं ही निव्वळ तांत्रिक बाब नसून हा ठाकरेंचा प्री-प्लान होता हे स्पष्ट झालं आहे. राज्यपाल कोश्यारींचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना थेट फोन येऊन आर्जव व्हावं यासाठीच हा खास ‘युटी’ प्लान होता. त्यात मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव आशिष कुमार सिंह आणि विकास खारगे यांचा समावेश होता.

राज्याचे राज्यपाल हे घटनात्मक पद असून या पदावरील व्यक्तीला विशेष अधिकार आहेत. त्यामुळे राज्यपाल हवाई मार्गाने प्रवास करत असताना राजभवन वरील त्यांच्या कार्यालयातून सामान्य प्रशासन विभागाला पत्र पाठवून विमानाची मागणी केली जाते. त्यानुसार विमान आरक्षित झाल्यावर एअर ट्रॅफिक कंट्रोलर उड्डाणासाठी वेळ आणि दिशा ठरवून देतो. त्यानंतर राज्यपालांबरोबर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची एक यादी बनवली जाते. या यादीनुसार विमानाचा फ्लाइट प्लान तयार होतो. त्यानंतर या विमानातील कर्मचारी आणि वैमानिक यांची नावे निश्चित करून ती राजभवनला कळवली जातात. विमानाचं आरक्षण झाल्यानंतरच राज्यपाल राजशिष्टाचारानुसार राजभवन सोडतात. राज्यपाल विमानतळावर पोचल्यावर फ्लाइट प्लॅन नुसार विमान ‘फ्लाईट बे’ वर येतं. त्यानंतर या विमानाच्या उड्डाणासाठी एटीसी म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोलर निर्देश देतं. गुरुवारी सकाळी राज्यपाल विमानात बसल्यानंतर तांत्रिक कारणानुसार विमान उड्डाण करणार नसल्याचं वैमानिकाकडून सांगण्यात आलं. याबाबत कॅप्टनने एओसीसीला न विचारताच विमान उड्डाण न होण्यासाठी तांत्रिक कारण देऊन राज्यपालांना पायउतार व्हायला भाग पाडलं गेलं. राज्यपालांसारखी घटनात्मक पदावरील व्यक्ती विमानात बसली आणि राज्यसरकारची परवानगी नसल्याने पायउतार झाली हे राज्याच्या निर्मितीपासून पहिल्यांदाच घडले आहे. याबाबत हवाई वाहतूक तज्ज्ञांना विचारले, असता एक ज्येष्ठ वैमानिकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले, जर सरकारने परवानगी दिली नव्हती तर विमान ‘बे’ वर लागलंच कसं? आणि परवानगी नव्हती तर एटीसी परवानगी न देताच विमानाचे दरवाजे कसे उघडले गेले? असं कधीही शक्य नसतं. कारण विमान उड्डाणासाठी एक काटेकोर नियमसंहिता असतं. ती मोडणं असं सहज शक्य नसतं.’

- Advertisement -

राज्यपालांच्या या अवमानानंतर ते दुसऱ्या व्यावसायिक विमानाने मसुरीला रवाना झाले. मात्र त्यानंतर ठाकरे सरकारवर चहुबाजूंनी जोरदार टिका सुरु झाली.

सनदी अधिकारीच या षडयंत्रामागे

राज्यपाल कोश्यारी यांच्या अवमानानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. गांभीर्य लक्षात येताच मातोश्रीवरील मुख्यमंत्री ठाकरेंच्या निकटवर्तीयांनी विमानाच्या वैमानिकाची झाडाझडती केली. त्याचप्रमाणे या वजनदार निकटवर्तीयाने एटीसीच्या वजनदार अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत कुणाच्या परवानगीने खासगी विमान रन-वे वर आणण्यात आले, अशी विचारणा केली. तसेच या संपूर्ण घटनेचा शिल्पकार मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी मुख्यमंत्री ठाकरेंच्या बदनामीसाठी रचलेलं हे कुभांड असल्याची चर्चा मंत्रालयात सुरु होती. आशिष कुमार सिंह यांनी राज्यपाल कोश्यारी यांचे एडीसी संतोष कुमार रस्तोगी यांना केवळ मुख्यमंत्र्यांशी महामहिम राज्यपालांनी याबाबत बोलावे असा निरोप दिला होता. मात्र, राज्य सरकारने खासगी विमान घेऊन जाण्याची परवानगी दिलेली नाही, असा निरोप सोयिस्करपणे देण्याचे टाळले.

- Advertisement -

फोनसाठी पायउतार!

राज्यपाल- मुख्यमंत्री यांचे संबंध हे ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून काहीसे ताठरच आहेत. राज्यपाल कोश्यारी हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फारसे फोनही करत नाहीत. राज्यपाल कोश्यारी यांच्याशी २६ नोव्हेंबरला ठाकरे यांचं शेवटचं संभाषण झाल्याचं राजभवनावरील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राज्यपालांनी आपल्याला सरकारी विमानासाठी आर्जवं करावं यासाठीच उध्दव ठाकरे यांनी संबंधितांना या पायउताराबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कालच मुलाच्या लग्नात व्यस्त असतानाही विकास खारगे यांनी याबाबतची व्यूहरचना केली. यात त्यांना आशिष कुमार सिंह यांनी मोलाची साथ देत हा राज्यपाल कोश्यारी यांचा ऐतिहासिक अवमान घडवून आणला. तरीही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आर्जव न करताच भगतसिंह कोश्यारी हे मसुरी येथील आयएएस अकादमीच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले. त्यानंतर मंत्रालयात ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनी राज्यपाल कोश्यारी यांना असलेल्या राज्यसरकारच्या सुरक्षा व्यवस्थेत लक्षणीय कपात करण्यासाठी मंथन सुरु केल्याचंही विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं.

शासकीय कार्यक्रमातच दोघांमध्ये संवाद

राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याध्ये कायम सुसंवाद असला पाहिजे. मात्र, उद्धव ठाकरे जेव्हापासून मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला, तेव्हापासून राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये केवळ शासकीय कार्यक्रमांमध्ये संवाद होतो, असं खात्रीलायक सूत्रांकडून कळते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २६ नोव्हेंबर ला एकत्र आले. त्यानंतर थेट २६ जानेवारी शिवाजी पार्कला प्रजासत्ताक दिनी एकत्र आले. दोघांमध्ये शाब्दिक विसंवाद आहे. केवळ शासकीय कार्यक्रमांमध्ये या दोघांमध्ये हस्तांदोलन, संवाद होतो. या विसंवादामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे पाठवलेल्या अनेक फाईलींवर राज्यपालांनी स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. यामध्ये १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची फाईल देखील आहे.


हेही वाचा – राज्यपाल विमान उड्डाणाच्या वादानंतर आता मुख्यमंत्री सचिवालयाचं स्पष्टीकरण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -