राज्याचे गृहमंत्री फडणवीस सांगतात, “मुश्रीफांच्या घरी छापा पडला हे माहिती नाही”

पहाटेपासून मुश्रीफांच्या घरी छापासत्र सुरू असून याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला काही माहिती नसल्याचं सांगितलंय. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Devendra Fadanvis on hasan mushrif

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आज पहाटे सहा वाजल्यापासूनच ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली. कागल येथील घरावर छापा टाकण्यात आलाय. ईडीकडून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. या कारवाईत कोणताही हस्तक्षेप होऊ नये म्हणून मुश्रीफ यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यानंतर कागलमध्ये मुश्रीफांच्या निवासस्थानासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. पहाटेपासून मुश्रीफांच्या घरी छापासत्र सुरू असून याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला काही माहिती नसल्याचं सांगितलंय. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या नगरमध्ये एका कार्यक्रमसाठी आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईने त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. ईडीच्या कारवाईने कागलमध्ये संतप्त वातावरण निर्माण झालंय. अनेक कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांच्या निवासस्थानाबाहेरच आंदोलन सुरू केलंय. एका मुश्रीफ समर्थकाने सीआरपीएफ जवानांच्या समोर जमिनीवर डोके आपटून घेतल्याने तो जखमी झाला. बंदोबस्तास आलेल्या पोलिसांशी समर्थकांची बाचाबाची होत आहे. कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारातच ठिय्या मारत घोषणाबाजी केली.

या सर्व घटनेबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुश्रीफांच्या घरी छापा पडला हे माहिती नसल्याचं सांगितलं. मी केवळ माध्यमांमध्ये आलेली बातमी पाहिल्याचं यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगाबादच्या नामांतराविरोधात आंदोलन सुरू करणाऱ्या आंदोलकांना त्यांचं आंदोलन मागे घेण्याचं त्यांनी आवाहन केलंय. “शेवटी भारतात काहीही झालं तरी छत्रपती संभाजीराजेंचा उदो उदो होईल, औरंगझेबाचा उदो उदो होऊ नाही शकत. त्यामुळे त्या ठिकाणी शांतता नांदावी यासाठी जे काही प्रयत्न आम्हाला करावे लागतील ते आम्ही करू.” असं यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच उद्योगजकांना ब्लॅकमेल करणाऱ्यांवर कारवाई करणार, असं सांगून देवेंद्र फडणवीसांनी थेट इशारा दिलाय.