मुंबई – देशाचे कृषी मंत्री म्हणून शरद पवारांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात जेवढे काम झाले, ते आजपर्यंतचे सर्वोत्तम काम असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मालेगावमध्ये सहकार परिषदेला संबोधित करताना शरद पवारांनी 10 वर्षांच्या कार्यकाळात काय केले? असा सवाल करत, फक्त मार्केटिंग नेता बनून फिरणं पुरेसं नाही, तर जमिनीवर काम करावं लागतं, असा टोला शरद पवारांना लगावला होता. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पवारांच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळाचा हिशेबच अमित शहांना दिला आहे. शरद पवारांनी केरळातील सुपारीपासून काश्मिरच्या सफरचंदापर्यंतच्या शेतकऱ्यांना मदत केल्याचा दावा करत जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
जयंत पाटलांनी दिला अमित शहांना सुपारीपासून सफरचंदापर्यंतचा हिशेब
जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करुन माजी कृषीमंत्री शरद पवारांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात देशातील शेती, फलोत्पादन, सहकार क्षेत्रात झालेल्या विकासाचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले की, अमित शहांनी शरद पवारांनी दहा वर्षांच्या कार्याकाळात काय केलं, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला असता तर भारताच्या इतिहासामध्ये कृषीमंत्री म्हणून एवढं उत्तम काम कोणीच केलं नाही, हे त्यांनाही मान्य करावे लागले असते. शरद पवारांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात देशाच्या अन्नधान्य उत्पन्नात 60 दशलक्ष टन वाढ झाली. एकेकाळी अन्नधान्याची आयात करणारा देश निर्यात करायला लागला. 2004 मध्ये शरद पवारांनी कापसाला 3,500 रुपये भाव मिळवून देण्याचे काम केले. 2013 मध्ये इतिहासात प्रथमच भारताने 100 दशलक्ष टन तांदूळ उत्पादन केले. जगाने तेव्हा त्यांची वाहवा केली होती.
देशाच्या चौकाचौकात दिसणारी विविध फळं पवारांच्या फलोत्पादन धोरणाचा परिणाम
शरद पवारांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सुरु केले. त्यावर 8 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्याचा परिणाम होऊन आपली देशांतर्गत गरज भागवून देशाला 14 हजार कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले. त्यांच्याच कार्यकाळात देशाने नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन लागू केलं. त्यामुळे राज्यात आणि देशात लाखो हेक्टर क्षेत्रावर फलोत्पादन सुरु करण्यात आले. फलोत्पादनात भारत 75 दशलक्ष टनापर्यंत पोहचला. आज देशात कोणत्याही चौका-चौकात गेलं तर विविध प्रकारची फळं दिसतात, तो या धोरणाचा परिणाम आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असंही जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रीय संशोधन संस्थांची स्थापना
आज 80 लाख हेक्टर जमिनीवर 147 दशलक्ष टन भाज्यांचे उत्पादन होते. 87 देशांमध्ये भारतातील ताजी फुलं निर्यात होतात. शरद पवारांनी द्राक्ष, कांदा, लसूण, केळी या या पिकांवर राष्ट्रीय पातळीवर संशोधन केंद्र उभी केली. त्याचा फायदा या पिकांच्या उत्पादकांना मिळाला. इंडियन कॉन्सिल फॉर अॅग्रीकल्चर रिसर्च (आयसीएआर) या कृषी संबंधी संशोधनात अग्रणी असलेल्या संस्थेच्या उभारणीत पवारांनी पुढाकार घेतला. या संस्थेत आज पाच हजार संशोधक काम करतात.
71 हजार कोटींची कर्जमाफी
या देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणी केली हे देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन विचारले तर शेतकरी सांगतील की शरद पवार यांच्या पुढाकारने मनमोहनसिंगांच्या सरकारने 71 हजार कोटींची कर्जमाफी केली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे काम देशात कोणी केलं असेल तर ते शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली झालं, असं जयंत पाटील म्हणाले. विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढल्या होत्या तेव्हा शरद पवारांनी तत्कालिन पतंप्रधान मनमोहन सिंग यांना अमरावतीला बोलवलं आणि त्या काळात 3000 कोटींचं पॅकेज शेतकऱ्यांना दिलं.
शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज
राष्ट्रीयकृत बँकांना शेतीसाठी कर्ज पुरवठा करणं सक्तीचं आणि अनिवार्य करण्यात आलं. त्यामुळ कृषी पतपुरवठ्याची रक्कम 86 हजार कोटी रुपयांवरुन 8 लाख कोटी रुपयांवर गेली. हेही शरद पवार यांच्या नेतृत्वात झालं, असा दावा जयंत पाटील यांनी केला. पूर्वी शेतीसाठीचे कर्ज १३ टक्क्याने दिले जात होते, ते त्यांनी सहा टक्क्यांवर आणलं आणि नियमीत कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन टक्क्यांनी कर्जपुरवठा देण्याची सवलत केली. एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी केले.
कृषिपंपाचे बील मीटर ऐवजी हॉर्स पॉवरप्रमाणे सुरु करण्याचा क्रांतिकारी निर्णय शरद पवारांच्या कार्यकाळात घेण्यात आला. अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या ज्या महाराष्ट्रातच नाही तर देशात लागू केल्या, याची माहिती अमित शहांनी घेतली पाहिजे होती, असा टोला जयंत पाटलांनी लगावला.
जयंत पाटलांचा शहांना इशारा…
सहकारी साखर कारखान्यांचे शासकीय भाग भांडवल 5 पटींवरून 9 पटींवर नेण्याचा निर्णय त्यांनी केला. त्यामुळे अनेक सहकारी साखर कारखाने उभे राहिले. शेतीसंबंधीतील कोणतेही क्षेत्र घेतले तर त्यात त्यांनी अमुलाग्र काम केले. कुकुटपालन, वराहपालन, शेळी-मेंढी पालन, मधुमक्षी पालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, दूध उद्योग यातील सर्व प्रश्नांची उकल करण्याचा आणि या घटकांना मदत करण्याचे काम त्यांनी केले. शरद पवार यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात देशातील शेतकरी श्रीमंत झाला. त्याची क्रयशक्ती वाढवण्याचे क्रांतिकारक काम मनमोहनसिंगाच्या नेतृत्वात शरद पवारांनी कृषिमंत्री म्हणून केले. केरळच्या सुपारीपासून काश्मिरच्या सफरचंदापर्यंत आणि महाराष्ट्रातील प्रत्येक पिकासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम शरद पवारांनी केले.
अमित शहांनी वारंवार महाराष्ट्रात येऊन शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? हा प्रश्न विचारण्याचे धाडस यापुढे करु नये, असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा : Amit Shah : शरद पवार साहेब मार्केटिंग नेता बनून फिरणं पुरेसं नाही; अमित शहांनी मागितला दहा वर्षांचा हिशेब