धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ‘ढोल बजाओ, सरकार जगाओ’ आंदोलन

धनगर आरक्षणाच्या मागणीवरुन आता धनगर समाज आक्रमक झाला असून राज्यभरातील वेगवेगळ्या पातळ्यांवर 'ढोल बजाओ, सरकार जगाओ' आंदोलन केले जाणार आहे.

statewide dhol bajao sarkar jagao movement for reservation of dhangar samaj
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी 'ढोल बजाओ, सरकार जगाओ' आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीने निर्माण झालेली मराठा आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये जोरदार खल सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून येत्या काही दिवसात मराठा समाजाला दिलासा देणारा निर्णय होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे धनगर आरक्षणाबाबत १० महिन्यांपासून झोपी गेलेल्या कुंभकर्ण सरकार विरोधात भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. येत्या २५ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी ‘ढोल बजाओ, सरकार जगाओ’ आंदोलनाची घोषणा पडळकर यांनी केली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत घोषणा केली आहे.

धनगर आरक्षणाच्या मागणीवरुन आता धनगर समाज आक्रमक झाला असून राज्यभरातील वेगवेगळ्या पातळ्यांवर आंदोलन केले जाणार आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा राज्यभर ‘ढोल बजाव, सरकार जगाव’ हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले आहे. ‘२५ सप्टेंबर रोजी पंढरपूर या ठिकाणी विठ्ठल मंदिरासमोर स्वतः ढोल वाजवत सरकार विरोधात हे आंदोलन करणार’, असल्याचे आमदार पडळकर यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या दहा महिन्यांपासून सरकार सत्तेमध्ये आलेले आहे. मात्र, धनगर आरक्षणाच्या बाबतीत एक पाऊलही सरकारने उचलेले नाही, तर भाजपा सरकारने सत्तेत असताना धनगर समाजासाठी एक हजार कोटींची तरतुदी केली होती. मात्र, त्यामधील एक रुपया सुद्धा या सरकारने दिला नाही, याशिवाय धनगर आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका ही सरकारकडून घेण्यात आली नाही, असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून तातडीने आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारकडून धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत दुजाभाव होत आहे, त्यामुळे आता समाजाच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. – गोपीचंद पडळकर; भाजप, आमदार


हेही वाचा – ‘नवीन कायद्यामुळे कृषी क्षेत्रात कंपनीराज येणार’, बाळासाहेब थोरात यांची टीका