घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रएस.टी.चे स्टेअरिंग महिलांच्या हाती; माधवी साळवे ठरल्या नाशिकच्या पहिल्या एसटी चालक

एस.टी.चे स्टेअरिंग महिलांच्या हाती; माधवी साळवे ठरल्या नाशिकच्या पहिल्या एसटी चालक

Subscribe

नाशिक : संसाराचा गाडा हाकणार्‍या महिलेच्या हाती आता थेट एस.टी. बसचे स्टेअरिंग आले आहे. आजवर केवळ वाहक अर्थात कंडक्टर म्हणून काम करणार्‍या महिला एस.टी. बसचालक म्हणूनही आपले कौशल्य दाखवत असल्याने प्रवाशांसाठीही एस.टी.चा हा निर्णय लक्षवेधी आहे. माधवी साळवे या पहिल्याच एस.टी. बसचालक ठरल्या आहेत. त्यांनी नाशिक ते सिन्नर मार्गावर बस चालवून महिलांना नवी वाट दाखवली आहे.

नाशिकमधील धुडगाव येथे राहणार्‍या माधवी यांचा गृहिणी ते बसचालक असा प्रेरणादायी प्रवास आहे. एसटी महामंडळाने 2019 च्या भरती प्रक्रियेत 206 महिलांची चालक पदावर निवड केली होती. या सर्व महिलांना एक वर्ष जड वाहन (हेवी व्हेईकल) चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर या महिलांनी एक वर्ष एसटी बस चालवण्याचा सराव केला. आता या महिलांना एसटी बसवर चालक म्हणून रीतसर रूजू करून घेण्यात आले आहे. माधवी यांना लहानपणापासून वाहन चालवण्याची आवड आहे. एसटी महामंडळात कुणीही महिला नसल्याने एसटीची निवड केल्याचे माधवी यांनी सांगितले. अधिकाधिक महिलांनी या क्षेत्रात येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

- Advertisement -

रुपाली चाकणकर यांच्याकडूनही कौतूक

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीदेखील महिला एसटी चालकांचे कौतूक केले. एका पोस्टद्वारे त्यांनी महिला चालकांचे अभिनंदन केले. चाकणकरांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, नवी जबाबदारी तुझी, एसटी प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची… राज्य महिला आयोगाच्या वतीने एसटी महिला चालकांचे मनःपूर्वक अभिनंदन..!

एसटी महामंडळाचे धाडसी पाऊल

महिलांची बसचालक तथा वाहकपदी भरती करण्यादृष्टीने त्यांना अनुभव तसेच, उंचीच्या अटीमध्ये काहीअंशी सवलत देण्यात आली होती. आदिवासी भागातील महिलांनादेखील संधी देण्यात आली आहे. यात प्रारंभी हलके वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर अवजड वाहनांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर यातील काही महिलांची निवड थेट बसचालक म्हणून करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना एसटी चालकांचे प्रशिक्षण देऊन महामंडळाने त्यांना करिअरचा नवा मार्ग दाखवला आहे. हा प्रयोग देशभरातील महिला व मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. महिलांना एसटी बसचालक म्हणून प्रशिक्षण देऊन महामंडळाने सामाजिक आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -