घरमहाराष्ट्रनाशिककौमार्य चाचणीचे किळसवाणे रुप

कौमार्य चाचणीचे किळसवाणे रुप

Subscribe

वर्षभरात गंभीर प्रकारचे १९ गुन्हे दाखल,केला जातो सेक्सचा डेमो ,पॉर्न फिल्म दाखवून उद्दिपन

कौमार्य चाचणी करायला भाग पाडणारी व्यवस्था जात पंचायतीच्या रुपाने कंजारभाट समाजात रुढ असताना त्याचे अधिक भयावह आणि किळसवाणे रुप आता बाहेर येत आहे. कौमार्य चाचणीसाठी लैंगिक संबंध करण्यास कुणाची इच्छा न झाल्यास त्याला चक्क पॉर्न फिल्म दाखविली जाते. तरीही दाम्पत्य संबंधास तयार नसेल तर अन्य एखादे दाम्पत्य चक्क त्यांच्यासमोर ‘सेक्स’चा डेमो करुन दाखवते, अशी माहिती प्रथेविरुध्द चळवळ उभी करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिलीकाही दिवसांपूर्वीच कंजारभाट समाजातील उद्योजक तथा पुण्याच्या माजी नगरसेवकाने आपल्या होणार्‍या सुनेची कौमार्य चाचणी घेतल्याचा गंभीर प्रकार पुढे आला होता. त्यामुळे जात पंचायतीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला. या प्रथेविरोधात stop the V Ritual नावाने समाजातील काही तरुणांनी आता चळवळ सुरू केली आहे. त्या अंतर्गत समाजाची मानसिकता बदलण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे अन्य समाजाला या प्रथेचे भयावह स्वरुपही निदर्शनास आणून देत दबावगट तयार केला जात आहे. चळवळीतील कार्यकर्ते विवेक तमाईचेकर यांनी याविषयी बोलताना सांगितले की, कंजारभाट समाजात कमालीची एकी असल्याने अशा अनिष्ट प्रथांचा कायमस्वरुपी बिमोड करण्यात अडचणी येत आहेत.

तीन महिन्यातील पाच प्रकरणे-
प्रकरण १-
एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍याच्या पुतणीला नंदुरबार येथील न्यायालयातील निवृत्त अधीक्षकांच्या मुुलाशी विवाह झाला. याच पदाधिकार्‍याचा पुतण्या व पुण्याजवळील मुंढव्यातील एका कुटुंबातील मुलीचा कोरेगाव पार्क येथे विवाह झाला. विवाहाच्या दुसर्‍या दिवशी जात पंचायत भरविली गेली. सदस्यांनी वरांना त्यांची वधू शुध्द आहे का अशी विचारणा केली. त्यासाठी त्यांनी एकाला ‘तू सात विहिरी ओलांडून गेला. तुला काही अडचण आली का?’ तर दुसर्‍याला ‘तुझा माल खरा आहे का?’ अशी विचारणा केली. यावेळी दोन्ही वरांनी होकारार्थी मान हलवून संमती दिल्याचे धर्मदाय आयुक्तालयातील संचालक कृष्णा इंद्रेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रकरण २-
जात पंचायतीतील अनिष्ट प्रथांविरोधात लढणार्‍या ऐश्वर्या तमाईचेकर यांनी पिंपरी-चिंचवड परिसरातील दांडिया कार्यक्रमात भाग घेतला म्हणून त्यांची अवहेलना करण्यात आली. समाजातील महिलांची अब्रू वेशीवर आणणार्‍या महिलेला समाजाच्या कार्यक्रमात स्थान नसल्याचे काही मंडळींनी सांगितल्याने संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरण ३-
पुण्यातील एका साडेपंधरा वर्षाच्या मुलीचे सातार्‍यातील ३५ वर्षाच्या पुरुषाशी कोल्हापुरात लग्न लावण्यात आले. यातही जात पंचायतीची भूमिका मोठी होती. याविरोधात कोल्हापूर पोलिसांत तक्रार करण्यात आली असून मुलीच्या वयाचा दाखलाही सादर करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.

- Advertisement -

प्रकरण ४-
लग्नापूर्वीच शारीरिक संबंध प्रस्थापित करणार्‍या दांपत्याचा काही दिवसानंतर विवाह ठरला. ज्या वेळी शरीरसंबंध झाले तेव्हा मुलगी व्हर्जिन अर्थात कुमारिका होती का याची तपासणी पंचांनी सुरू केली. त्यास विरोध करणार्‍या विवेक तमाईचेकर यांना पत्नीसह लग्नघरातून बाहेर काढण्यात आले. तक्रारीनंतर अंबरनाथ पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला..

प्रकरण ५-
जात पंचायतींच्या अनिष्ट प्रथांना विरोध करणार्‍या प्रियांका तमाईचेकर यांना पिंपरी-चिंचवड परिसरातील एका लग्नास जाण्यास मज्जाव करण्यात आला. यावेळी पोलीस बंदोबस्तात त्या लग्नाला गेल्या. त्या मांडवातून बाहेर जात नाही, तोपर्यंत वरात मांडवात आली नाही.

प्रकरण ६-
पुणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवकाचा पुत्र तथा इंग्लडहून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या वराने उच्चशिक्षित वधूची ‘कौमार्य’ चाचणी घेतली. जात पंचायतीसमोर वराने आपण शारीरिक संबंधातून ‘समाधानी’ असल्याचे तीन वेळा सांगितले.

अशी केली जाते कौमार्य चाचणी-
लग्न झाल्यावर वर आणि वधूला हॉटेलमधील रुममध्ये नेले जाते. रुमबाहेर कुटूंबातील सदस्य आणि पंच बसून असतात. वधू-वराच्या पलंगावर पांढर्‍या रंगाचा कपडा अंथरला जातो. शरीर संबंधानंतर जर या कपड्यावर रक्ताचे डाग पडले असले तर तो ‘खरा माल’ असल्याचे जात पंचायतीला संबंधित वर सांगतो. डाग पडला नाही तर ‘माल खोटा’ असल्याचे सांगण्यात येते. या शब्दांमध्ये अलीकडे बदलही होत आहेत. पुण्याच्या प्रकरणात वराने ‘समाधानी आहे’, असे तीन वेळा सांगितले. त्यानंतर या लग्नावर शिक्कामोर्तब झाले. मुलगा शरीर संबंधात कमी पडला तर त्याला ‘लंगडा घोडा’ संबोधले जाते. ‘माल खोटा’ किंवा ‘लंगडा घोडा’ असला तर मग पापाचे परिमार्जनही करण्याची प्रथा आहे. त्यासाठी पंचांसमोर नाक रगडणे, देवासमोर बोकड बळी देणे अशा प्रथा आहेत. काहींना अघोरी शिक्षाही सुनावण्यात येतात. नातेवाईक मंडळी खोलीबाहेर बसली असल्याने अनेकांना शारीरिक संबंधाची इच्छा होत नाही. त्यावेळी काही ठिकाणी दाम्पत्याला पोर्नफिल्म दाखविली जाते. तरीही फरक न पडल्यास एखादे नातेवाईक दाम्पत्य प्रत्यक्षात ‘डेमो’ करुन दाखवते, असे विवेक तमाईचेकर, प्रियांका तमाईचेकर आणि कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले.

कौमार्य चाचणीला आम्ही विरोध करतो म्हणून आम्हाला वेगवेगळ्या पातळ्यांवरुन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. सामाजिक बहिष्काराबरोबरच घाणेरड्या शब्दांत सार्वजनिक ठिकाणी हिणवण्याचेही प्रकारही घडतात. पण आता तरुण-तरुणी या प्रकारांविरोधात पुढे येत आहेत. – प्रियंका तमाईचेकर,सामाजिक कार्यकर्त्या

माझ्या लग्नानंतर माझ्या पत्नीची कौमार्य चाचणी व्हावी यासाठी जात पंचायतीने आटोकाट प्रयत्न केले. तिचे आजोबा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर आहेत. समाजातील मोठे पंच असल्याने त्यांच्यावरही पंचायतीने दबाव आणला. माझ्याशी त्यांच्या नातीचे लग्न लावून देण्यास मज्जाव केला होता. समाजाने अनेक बाबतीत आम्हाला बहिष्कृत केले आहे. मात्र आम्ही अनिष्ट प्रथांना विरोध करतच राहू.– विवेक तमाईचेकर, सामाजिक कार्यकर्ते

राज्य सरकारने सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा लागू केल्यानंतर अन्य समाजातील जात पंचायतींमधील अनिष्ट प्रथा बर्‍यापैकी कमी झाली आहे. कंजारभाट समाजात मात्र ही प्रथा अद्यापही सुरु आहे. सुशिक्षित आणि प्रतिष्ठीतही या व्यवस्थेत गुंतलेले असल्याने प्रबोधनाच्या परिणामाची गती कमी आहे. सरकारने अस्तित्वात असलेल्या कायद्यात सुधारणा कराव्यात. साक्षीदाराशिवाय फिर्याद दाखल होत नसल्याची सर्वात मोठी अडचण आहे.
– कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, जात पंचायत मूठमाती अभियान.

कौमार्य चाचणीचे किळसवाणे रुप
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -