मुंबई विद्यापीठाचे पदवीचे प्रवेश थांबवा

सीबीएसईची यूजीसीकडे तक्रार

mumbai university

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त जागा ठेवण्याच्या सूचना करत मुंबई विद्यापीठाने पदवीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली. मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएसई) विद्यापीठ अनुदान आयोगाकडे तक्रार केली असून सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर होईपर्यंत पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू न करण्याचे आदेश सर्व विद्यापीठांना देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.

सीबीएसई परीक्षा विलंबाने झाल्याने त्यांचा दहावी व बारावीचा निकाल लांबणीवर पडला आहे, मात्र राज्य मंडळाचे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने पदवी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे काही स्वायत्त महाविद्यालये आणि विद्यापीठांनीही प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे निकाल लवकर जाहीर करण्यात यावा, अशी विनंती विद्यार्थ्यांकडून सीबीएसई मंडळाकडे करण्यात येत होती.

त्यामुळे सीबीएसईने विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी केंद्रीय मंडळाचा बारावीचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे पदवीची प्रवेश प्रक्रिया राबवल्यास केंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या विद्यापीठांनी पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्या विद्यापीठांना प्रवेश प्रक्रिया थांबवण्याच्या सूचना द्यावात, अशी मागणी त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केली आहे. याबाबत अनुदान आयोग नेमकी कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.