धाराशिव : श्रावणी सोमवारनिमित्त देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या ऑटोला ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये चार जणाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. ही घटना आज 28 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता दरम्यान सोलापूर-हैदराबाद मार्गावरील मन्नाळी येथे घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रेमीला सुनिल जगदाळे ( 32), सुनिल जगदाळे, अनुसया महादेव जगदाळे, पुजा विजय जाधव, असे अपघातात मृत्यू झालेल्या भाविकांची नावे आहेत.(Storm on devotees: Truck hits auto returning from Devadarshan; Four died)
श्रावणी सोमवारनिमित्त कर्नाटकातील श्रीक्षेत्र अमृतकुंड येथे दर्शन करुन परतत होते. रिक्षा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मन्नाळी येथे पोहचली असता ट्रकने रिक्षाला जोराची धडक दिली. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला असून मृतांमध्ये तिघे उमरगा तालुक्यातील सुंदरवाडी (विठ्ठल मंदिर माळ) येथील तर एक महाविद्यालयीन मुलगी शहापूर (ता.तुळजापूर) येथील रहिवाशी आहेत.
आमदारांनी केली विचारपूस
झालेल्या अपघाताची माहिती मिळताच बसवकल्याणचे आमदार शरणू सलगर यांनी घटनास्थळाला भेट देऊन अपघाताचे कारण समजून घेतले. तर उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचापूस केली. या अपघातात दोन लहान मुले बचावले आहेत.
हेही वाचा : पवारांनीच भुजबळांना तेलगी प्रकरणातून वाचवले! जितेंद्र आव्हाड यांचे संकेत
लहानग्यांचे छत्र हरवले
झालेल्या अपघातात सुनील जगदाळे आणि त्यांच्या पत्नी प्रमिला जगदाळे या दोघांचाही मृत्यू झाला. या दोघाना लक्ष्मी सुनील जगदाळे (8) तर अस्मिता शीवराम जगदाळे (10) ही दोन मुले असून, ते या अपघातात बचावले असून त्याना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या अपघातात या चिमुकल्यांची आजही दगावली असल्याने हे दोन्ही चिमुकले उघड्यावर आली आहेत.
हेही वाचा : “काँग्रेस पक्ष हा दीनदलितांचा आवाज आणि बाकीचे…”; प्रणिती शिंदेंची प्रकाश आंबेडकरांवर टीका
पोलीस येण्याआधीच ट्रकचालक अपघात स्थळावरून पसार
झालेल्या अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर बसवकल्याणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शिवमसू राजपूत, मंडळ पोलीस निरीक्षक सुवर्णा मलशेट्टी, पोलीस हवालदार राजशेखर रेड्डी, मल्लीकार्जुन सलगरे यांनी अपघातस्थळी जात जखमींना उमरग्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.