सर्वोच्च न्यायालयात वादळी सुनावणी, शिंदे गट आणि राज्यपालांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह!

Aggressive argument of Shinde group's lawyers in Supreme Court

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायलयात वादळी सुनावणी झाली. ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. तंसच, शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याही वतीने आज कोर्टात युक्तिवाद झाला. ठाकरे-शिंदे गटाचा युक्तिवाद शांततेत ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीश डी.व्हाय.चंद्रचूड यांनी शिंदे गटाला आणि राज्यपालांना फटकारले आहे. दरम्यान, आजची सुनावणी संपली असून उद्या पुन्हा ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करणार आहेत.

आम्हीच खरी शिवसेना असून शिवसेनेत फूट पडलेली नाही, असं शिंदे गटाकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. याच युक्तिवादावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी शिंदेगटाला आणि राज्यपालांना फटकारले आहे. जर तुम्हीच खरी शिवसेना आहात. शिवसेनेत फूट पडलेली नाही. मग तुमच्याबरोबर असलेले ३४ आमदारही शिवसेनेचे सदस्य असं म्हणूनच गृहीत धरावं लागेल. ते जर शिवसेनेचे सदस्य आहेत. मग सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा प्रश्न कुठे येतो?, असा सवाल सरन्यायाधीशांनी विचारला. यामुळे शिंदे गटाचा युक्तिवाद त्यांनाच कोंडीत टाकणारा ठरला आहे.

तसंच, महाविकास आघाडीत सरकारमधील तीन पक्षांनी तीन वर्षे सुखाने संसार केला. मग एका रात्रीत असं काय घडलं ज्यामुळे तीन वर्षांचा संसार मोडावा लागला? काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मतभेद नव्हते. दोघांचे मिळून ९७ आमदार आहेत. हा आकडाही मोठा आहे. शिवसेनेच्या ५६ पैकी ३४ आमदारांनी अविश्वास दर्शवला. त्यामुळे तीन पक्षांपैकी केवळ शिवसेनेतच मतभेद झाल्यानंतरही इतर दोन पक्ष आघाडीत कायम होते. बहुमत चाचणी बोलावण्याआधी राज्यपालांनी ही गोष्ट का लक्षात घेतली नाही? असं म्हणत न्यायाधीशांनी राज्यपालांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावतीने आज जनरल सॉलिसिटर तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला होता. सात मुद्द्यांच्या आधारे त्यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. त्यावेळी चंद्रचूड यांनीही मेहता यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यामुळे माझा युक्तिवाद झाल्यानंतरच तुम्ही प्रश्न विचारा अशी मेहता यांनी चंद्रचूड यांना विनंती केली.

कपिल सिब्बलांचा युक्तिवादात काय?

सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू असून शिवसेना पक्षाबाबतही युक्तिवाद सुरू आहे. कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत शिंदे गटाला कोंडीत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. घटनेच्या कोणत्या आधारावर ३४ आमदार म्हणतात की ते शिवसेना पक्ष आहे? शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष आहे. ४ जुलैपर्यंत कुणीही त्या निर्णयावर आक्षेप घेतला नव्हता किंवा तो बदलला नव्हता. मग शिंदे गट असा दावा कसा करू शकेल की आम्ही शिवसेना आहोत? त्यांचं म्हणणं आहे की पक्षात फूट नाही, पक्षांतर्गत दोन गट आहेत. पण निवडणूक आयोगासमोर ते म्हणाले की आम्ही पक्षातून फुटून निघालेलो गट आहोत. कारण जर ते पक्ष आहेत, तर त्यांना निवडणूक आयोगाकडे जाण्याची गरजच नव्हती. शिंदे गट शिवसेना पक्ष नाही, ते गट आहेत. त्यांना कोणत्या आधारावर राज्यपालांनी मान्यता दिली? असं करून आपण पुन्हा आयाराम-गयाराम संस्कृती आणतोय. जर तुम्ही गट असाल किंवा पक्ष असाल तर राज्यपालांनी त्यांना सांगायला हवं होतं की मी तुम्हाला मान्यता देऊ शकत नाही. यावर आधी निवडणूक आयोगानं निर्णय घ्यायला हवा होता. त्याआधी अपात्रतेचा निर्णय व्हायला हवा होता, असं कपिल सिब्बल म्हणाला.