नाफेडचे अजब माप! ५५-७० मिलिमीटरचाच कांदा खरेदी करणार, छोट्या कांद्याचं करायचं काय?

strange-measure-of-nafed-onion

कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे महाराष्ट्रासह देशातील शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांना उत्पादनापेक्षा कमी दर मिळतोय. तर दुसरीकडे नाफेड कांदा खरेदी म्हणजे नुसता गाजावाजा असल्याचा प्रकार समोर आला आहे. कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे शेतकरी त्रस्त असताना नाफेडने एक अजबच माप सुरू केलंय. ५५- ७० मिलिमीटरचाच कांदा खरेदी करणार असं नाफेडने म्हटलंय. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे असलेला हा पेच काही सुटत नाहीय.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तातडीच्या मुद्द्याद्वारे शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी सभागृहात कांद्याच्या खरेदीवर विस्तृत चर्चा करण्यात आली. नाफेड जर ५५ – ७० मिलिमीटरचाच कांदा खरेदी करणार असेल तर छोट्या आकाराच्या कांद्याचे करायचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

दोन दिवसांपूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्याला २ रुपयांचा चेक आल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही अटी व शर्तीशिवाय नाफेड कांदा खरेदी करेल, असं आश्वासन दिलं होतं. कांदा शेतकऱ्यांच्या या समस्येवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले, याची दखल उपमुख्यमंत्री यांनी घेऊन याबाबत माहिती घेणार असल्याचे सांगितले.

मात्र, अद्यापही कांद्याची खरेदी सुरु झाली नाही.त्यामुळं नाफडेकडून कांद्याची खरेदी कधी सुरु होणार याबाबत संभ्रम कायम आहे. फडणवीसांनी कांदा खरेदी करण्याची घोषणा केली मात्र, अंमलबजावणी कधी होणार आणि शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार? असा सवाल उपस्थित केला जातोय. दर कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. कांद्याला सध्या 300 ते 400 रुपयांचा दर मिळत आहे. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करुन कांदा उत्पादकांना सहाय्य करावं अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने पत्र लिहून केली आहे.