घरमहाराष्ट्रबाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांची ताकद...; अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळेंचे...

बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांची ताकद…; अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळेंचे लक्षवेधी ट्वीट

Subscribe

मुंबई : अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार गटाने शरद पवार गटातील आमदारांनी पक्षविरोधी कृत्य केल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात यावं, अशी मागणी विधिमंडळ अध्यक्षांकडे याचिकेद्वारे केली आहे. याशिवाय शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची ताकद भाजपाला बघवत नाही, असा टोला त्यांनी ट्वीट करत लगावला आहे. (Strength of Balasaheb Thackeray Sharad Pawar Supriya Sules eye-catching tweet during Amit Shahs visit to Mumbai)

हेही वाचा – आमदारांच्या अपात्रतेवरून सुरू असलेल्या गदारोळात केंद्रीय गृहमंत्र्यांचा मुंबई दौरा; घेतले लालाबाच्या राजाचे दर्शन

- Advertisement -

सुप्रिया सुळे यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात राहणारा प्रत्येकजण ‘मराठी माणूस’ अशी मराठी माणसाची व्याख्या केली होती. महाराष्ट्रीय माणसांनी प्रचंड मेहनत करुन, प्रागतिक विचार जोपासत विकसित महाराष्ट्राची उभारणी केली. अनेक क्षेत्रांत देशाला दिशा दाखविण्याचे काम केले. पण केंद्र आणि राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपाने येनकेनप्रकारे मराठी माणसांनी मोठ्या कष्टाने उभारलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष विधिनिषेध शून्य मार्गांनी फोडले, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरे – शरद पवार यांना मायबाप जनतेकडून भरभरून प्रेम

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविली. त्याचप्रमाणे शरद पवार यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करुन ती देशभरात पोहोचविण्याचे काम केले. या दोन्ही नेत्यांनी आपल्या कुटुंबाचा समाजकार्याचा वारसा घेऊन प्रचंड मेहनतीने डोंगराएवढे कार्य उभे केले व देशभरात दबदबा निर्माण केला. गेली साठ वर्षे या दोन्ही नेत्यांचे विचार आणि नेतृत्व मान्य करुन लाखो कार्यकर्त्यांनी हे पक्ष उभे केले. याबद्दल आम्ही सदैव त्यांच्या ॠणात आहोत. देशातील व महाराष्ट्रातील मायबाप जनतेने दिवंगत बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांना भरभरून प्रेम दिले. पण त्यांची ही ताकद व हे प्रेम भाजपाला बघवत नाही, असाही आरोपा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 

हेही वाचा – शरद पवार गौतम अदानींच्या भेटीसाठी थेट गुजरातला; रोहित पवार म्हणतात…

भाजपाकडून पक्ष आणि माणसे कटकारस्थाने करून संपवण्याचा घाट

शरद पवार यांनी तीन वेळा कर्करोगाशी झुंज दिली. प्रत्येक वेळी ते जनतेचे प्रेम आणि आशिर्वाद यांच्या बळावर जनसेवेसाठी बरे होऊन पुन्हा कामाला लागले. यासाठी मायबाप जनतेचे आम्ही कायम ऋणी आहोत. महाराष्ट्रातील जनतेला भावणारे आणि त्यांच्या हितासाठी सदैव काम करणारे पक्ष आणि माणसे कटकारस्थाने करून संपवण्याचा घाट भाजपाने घातला आहे. त्यासाठी केंद्रातील एजन्सीजचा बेसुमार गैरवापर केला जातो आहे, पाण्यासारखा पैसा ओतला जातो आहे. महाराष्ट्रातील जनतेमध्ये आपापसात भांडणे लावून त्यांची ताकद खच्ची करून भाजपाला आनंद मिळतो, परंतु या तत्वशून्य फोडाफोडीतून राज्याची प्रतिमा मालिन करण्याचे पाप भाजपाला करत आहे. लोकशाही व्यवस्थेत अत्यावश्यक असणारी विरोधी पक्षांची आणि विचारांची ‘स्पेस’ भाजपाला मान्य नाही, हेच सातत्याने अधोरेखित होते आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -