घरCORONA UPDATEकोरोनामुळे शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास ५० लाखांची मदत देण्याचा प्रस्ताव - अजित...

कोरोनामुळे शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास ५० लाखांची मदत देण्याचा प्रस्ताव – अजित पवार

Subscribe

कोरोना प्रतिबंधात विविध विभाग चांगले काम करत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कोरोनाच्या विरोधात कार्यरत असणाऱ्या शासनाच्या कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोना प्रादूर्भावामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत देण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा झाली आहे, असे सांगतानाच याबाबत योग्य तो निर्णय होईल असे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले. पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

मार्च महिन्यात अजित पवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत देणार, अशी घोषणा केली होती. त्यानंतर आरोग्य विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे कोरोना विरोधात लढणाऱ्या इतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील काहीतरी मदतीची घोषणा करावी, अशी मागणी सातत्याने होत होती. आज पुण्यातील बैठकीत अजित पवार यांनी पोलिसांप्रमाणेच कोरोनाविरोधात लढणाऱ्या इतर शासकीय कर्मचाऱ्यांना देखील अशाप्रकारे मदत देण्याचे संकेत दिले आहेत. मात्र याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

देशात आणि राज्यात लॉकडाऊन जाहीर करुन एक महिना झाला. तरी राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीच राहिली आहे. विशेषतः मुबंई आणि पुण्यात रुग्णसंख्या कमी होत नाही. यावर आता कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी अजित पवारांनी काही उपाय सुचवले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी टाळेबंदीचे निर्बंध कडकपणे राबवावेत, असेही अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच योग्य ते उपाय सुचवून त्यांची गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या व मृत्यूदर कमी करणे आवश्यक आहे. या भागात गर्दी होऊ नये यासाठी येथील शॉपिंग मॉल कोणत्याही परिस्थितीत सुरु करण्यात येऊ नयेत असे निर्देश अजित पवार यांनी दिले.

- Advertisement -

कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक निधी आणि इतर मदत तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल. कॅन्टोन्मेंट भागात लॉकडाऊनचे धोरण पोलीस प्रशासनाने कडक अवलंबून कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. यापूर्वी क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना वेळेत चांगल्या दर्जाचे भोजन पुरवावे. शहरातील रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी झोपडपट्टी भागातील कुटुंबियांचे संस्थात्मक क्वारंटाईन करुन त्यांना अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करण्याबाबत नियोजन करावे. प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेले निर्बंध पाळून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्यसेवा तत्पर आणि सक्षम होण्यासाठी ससून रुग्णालयाच्या नवीन अकरा मजली इमारतीची उर्वरित कामे गतीने पूर्ण करावीत, असे सांगून रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास त्यांच्यावर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने काटेकोर नियोजन करावे. गरज भासल्यास शिवछत्रपती क्रीडा संकुलाची इमारत व शैक्षणिक संस्थांच्या इमारतीमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देता येईल असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -