Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र लॉकडाऊनऐवजी कठोर निर्बंध; टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय

लॉकडाऊनऐवजी कठोर निर्बंध; टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाच्या संसर्गाचा स्फोट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ज्या विभागात निर्बंधांकडे दुर्लक्ष केले जात आहे तिथल्या अधिकार्‍याला जबाबदार धरून तिथे कठोर निर्बंध लादण्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासी पार पडलेल्या टास्क फोर्सच्या विशेष बैठकीत राज्यभरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. चिंताग्रस्त स्थितीत हॉस्पिटल्सची उपलब्धता, तिथल्या बेड्सची संख्या, औषधांचा पुरवठा, ऑक्सिजनचा पुरवठा याबाबत सविस्तर चर्चेत उणिवांबाबत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना संसर्गाच्या गंभीर स्थितीत कुठे काय उणिव आहे त्याबाबत व्यापक चर्चा टास्क फोर्सच्या बैठकीत करण्यात आली. ज्या ठिकाणी निर्बंध पाळले जात नाही त्या ठिकाणी अधिक कडक निर्बंध करून गर्दी टाळण्याचे मार्ग आखून दिले जातील. निर्बंधावर योग्य अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत चुकारपणा होऊ नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. लॉकडाऊन करू नये, असा सर्वच राजकीय पक्षांचा प्रवाह आहे. याचे विपरित परिणाम होत असल्याचे बहुतांश राजकीय पक्षनेत्यांचे म्हणणे आहे. यामुळे लॉकडाऊन न करता निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले आहे. सरकारी कार्यालयांचे काम ‘वर्क फ्रॉम होम’नुसार केले जावे, असेही बैठकीत सूचित करण्यात आले आहे. राज्यात सुरू असलेली रात्रीची संचारबंदी तशीच सुरू ठेवली जाणार आहे.

- Advertisement -

निर्बंध लावल्यानंतरही ज्या ठिकाणी गर्दी वाढतेय, तिथे कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकांनी काही दिवस नियमांचे पालन केले तर लॉकडाऊन करण्याची आवश्यकता पडणार नाही, असे टोपे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. सामान्य उपाय संपतात तेव्हा तातडीचा इलाज म्हणून लॉकडाऊन केले जाते. लोक स्वयंशिस्त पाळत नसल्याने निर्बंध कडक करावे लागत आहेत, असे टोपे म्हणाले. तोंडातल्या शिंतोड्यातूनच कोरोनाचा संसर्ग होतो. यामुळे त्रिसुत्रीचा अंमल लोकांनी केला पाहिजे.

लागलीच चाचणी केली जात नसल्याने तरुणांनाही ऑक्सिजन बेड्स द्यावे लागत असल्याचे टोपेंनी स्पष्ट केले. लक्षणे दिसली की तातडीने टेस्ट करण्याचे आवाहन आरोग्य मंत्र्यांनी केले. ज्यांना बेड्सची आवश्यकता नाही त्यांनी आयसीयूचा बेड घेऊ नये. याबाबतच्या सूचना देण्यात आल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. यापूर्वी जिल्ह्याजिल्ह्यातील परिस्थिती पाहून तिथल्या जिल्हाधिकार्‍यांना लॉकडाऊनचे अधिकार देण्यात आले होते. यामुळे सारे निर्णय त्यांच्या मर्जीने होत होते. आता ते मुख्यमंत्री स्तरावर होतील, असे टोपे म्हणाले.

- Advertisement -

लोकलबाबतही आढावा घेतलेला आहे. त्याही बाबतीत काही गाईडलाईन्स जाहीर होतील. लोकलमध्ये कसे राहावे याबाबत सूचना दिल्या जातील. कोणत्याही परिस्थितीत संसर्ग टाळावे. महाराष्ट्रात आरोग्याची व्यवस्था ठीक आहे. काही उणिवा आहेत. त्याबाबतच निर्णय घेतला जातोय, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -