घरमहाराष्ट्रगटनेते, प्रतोदपदावरून शिवसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंकडून भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती

गटनेते, प्रतोदपदावरून शिवसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंकडून भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती

Subscribe

शिंदे गटाच्या आमदारांनी पत्रात  एकनाथ शिंदे यांना गटनेते म्हणून समर्थन देताना राज्य सरकारमधील भ्रष्टाचारामुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. या गटाचा रोख थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे.आम्ही एकमताने एकनाथ शिंदे यांची ३१ ऑक्टोबर २०१९ मध्ये शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते म्हणून निवड केली होती. २०१९ साली झालेल्या १४ व्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी निवडणूक पूर्व युती झाली होती.

शिवसेना आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते आणि मुख्य प्रतोद पदावरून संघर्ष सुरु झाला आहे.  शिवसेनेचे  मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी बुधवारी शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या  बैठकीबाबत नोटीस जारी केली. या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या   आमदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा  इशारा दिल्यांनतर  एकनाथ शिंदे यांच्या गटाने प्रभू यांची या पदावरून हकालपट्टी करत भरत गोगावले यांची नियुक्ती केली. तसेच शिवसेनेचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते हे एकनाथ शिंदे हेच असून अनिल चौधरी यांची केलेली नियुक्ती ही अवैध आहे, असा दावाही शिंदे गटाने केला आहे. यावर आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना निर्णय करावा लागणार आहे.

सुनील प्रभू यांनी बंडखोर आमदारांना पत्र जारी करत वर्षा वरील  बैठकीला हजर राहा नाहीतर कारवाईला तयार रहा, असा  इशारा दिला. तुम्ही बैठकीला हजर राहिला नाहीत तर तुमचा पक्ष सोडण्याचा इरादा आल्याचे समजून कारवाई केली जाईल, असे या पत्रात नमूद करण्यात आले. या पत्रावर लगेच गुवाहटी येथे मुक्कामी असलेल्या शिंदे गटाने विधानसभा उपाध्य्क्षाना  पत्र पाठवून प्रभू यांचीच मुख्य प्रतोद पदावरून  हाकालपट्टी केल्याची माहिती दिली आहे. महाडचे आमदार भरत गोगावले यांची शिवसेना पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून दिली. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद हे भरत गोगावले असल्यामुळे मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांनी काढलेले आदेश अवैध  आहेत आणि  ते शिवसेना आमदारांना लागू नाहीत, असा पवित्रा  शिंदे गटाने घेतला. त्यामुळे शिवसेनेचा मुख्य प्रतोद कोण? हा आता तांत्रिक मुद्दा निर्माण झाला आहे.

- Advertisement -

पत्रावर ३४ आमदारांच्या सह्या
शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी ३५ पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचा दावा केला जात आहे . त्यामुळे संख्याबळ एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने आहे. ‘वर्षा’वर होणार्‍या शिवसेना आमदारांच्या बैठकीला शिंदे गटाचे आमदार उपस्थित राहणार नाहीत हे स्पष्ट आहे.  त्यामुळे या आमदारांवर काय कारवाई करता येईल, याबाबत शिवसेनेत  विचार मंथन सुरू आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक घेत त्यांची विधिमंडळ गटनेतेपदावरून हकालट्टी करत शिवडीचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती केली. मात्र ही नियुक्ती देखील अवैध असल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे. या पत्रावर ३४ आमदारांच्या सह्या आहेत. त्यात शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेल्या  ३० आमदारांचा समावेश आहे. याशिवाय प्रहार संघटनेचे  बच्चू कडू, राजकुमार पटेल अपक्ष आमदार  राजेंद्र पाटील – यड्रावकर, नरेंद्र भोंडेकर यांनी सह्या केल्या  आहेत.  या आमदारांनी शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे हेच असल्याचे म्हटले आहे. सह्या करणाऱ्या ३० आमदारांपैकी  बाळापूरचे आमदार नितीन देशमुख  राज्यात परतले आहेत.

- Advertisement -

सरकारमधील भ्रष्टाचाराला कंटाळलो
शिंदे गटाच्या आमदारांनी पत्रात  एकनाथ शिंदे यांना गटनेते म्हणून समर्थन देताना राज्य सरकारमधील भ्रष्टाचारामुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. या गटाचा रोख थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे.आम्ही एकमताने एकनाथ शिंदे यांची ३१ ऑक्टोबर २०१९ मध्ये शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते म्हणून निवड केली होती. २०१९ साली झालेल्या १४ व्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी निवडणूक पूर्व युती झाली होती. मात्र, पक्षाने मतदारांनी दिलेल्या कौलाच्या विरोधात जाऊन महाविकास आघाडी स्थापन केली. गेल्या अडीच वर्षात  सरकारमधील भ्रष्टाचारामुळे पक्षातील सदस्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान मंत्री नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. मलिक हे तर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या आरोपांवरुन तुरुंगात आहेत. देशमुख यांनी पोलिसांच्या नियुक्त्यांबरोबरच मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केला. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आम्हाला या अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये लोकांतून बरेच ऐकावे लागले, असा आरोप शिंदे गटाने केला आहे. त्याचवेळी सत्ताधारी पक्षाकडून सरकार असल्याने ते सत्तेचा आणि यंत्रणेचा वापर करुन आमचा छळ करत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

पत्रावर सह्या करणारे  बंडखोर आमदार
एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखाडी), संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम), प्रदीप जैस्वाल (औरंगाबाद मध्य), प्रकाश सुर्वे (मागाठाणे) लता सोनावणे (चोपडा) यामिनी जाधव (भायखळा) संदीपान भुमरे (पैठण) विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम) सुहास कांदे (नांदगाव) अनिल बाबर (खानापूर) चिमणराव पाटील (एरोंडेल) शहाजी पाटील (सांगोला) शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण) श्रीनिवास वनगा (पालघर) बालाजी किणीकर (अंबरनाथ) रमेश बोरनारे (वैजापूर) संजय रायमुलकर (मेहकर) महेंद्र दळवी (अलिबाग) महेंद्र थोरवे (कर्जत) भरत गोगावले (महाड) बालाजी कल्याणकर (नांदेड) अब्दुल सत्तार (सिल्लोड) प्रताप सरनाईक (ओवळा – माजीवाडा) ज्ञानराज चौगुले (उमरगा) संजय गायकवाड (बुलढाणा) महेश शिंदे (कोरेगाव) किशोर पाटील (पाचोरा)  नितीन देशमुख (बाळापूर) तानाजी सावंत (परांडा)

सह्या करणारे अन्य  आमदार
बच्चू कडू (अचलपूर) राजकुमार पटेल (मेळघाट) राजेंद्र पाटील – यड्रावकर (शिरोळ) नरेंद्र भोंडेकर (भंडारा)

स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी ३६ आमदारांची गरज
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना स्वतःसह आपल्या समर्थक आमदारांवरील पक्षांतर बंदी कायद्यानुसार होणार संभाव्य कारवाई टाळायची  असेल तर शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या ५६ आमदारांपैकी दोन तृतीयांश म्हणजे   ३६ आमदारांचे समर्थन मिळवावे लागेल. शिंदे गटाकडे ३६ आमदार असतील तर त्यांच्या गटाला विधासभेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळेल,अशी माहिती विधानभवनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी गटनेता बदलण्याचा निर्णय घेतला असेल तर तो अवैध ठरत नाही. गटनेता बदलासाठी आमदारांच्या सह्यांची गरज नाही, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. अर्थात आता गटनेते पदाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पत्रावर  विधानसभा उपाध्यक्ष हेच निर्णय घेतील, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -